
नागपूर : शहरातील गड्डीगोदाम परिसरात कत्तलीच्या उद्देशाने अमानुष परिस्थितीत ठेवलेल्या ११ जनावरांची सदर पोलिसांनी सुटका केली. शनिवारी (१८ एप्रिल २०२६) पहाटे ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे सुमारे १.४० वाजताच्या सुमारास गस्त पथकाला गड्डीगोदाम येथील लाल शाळा परिसरात काही जनावरे बांधून ठेवण्यात आल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तेथे ११ जनावरे अत्यंत अरुंद जागेत एकत्र कोंबून ठेवलेली आढळून आली. त्यांना ना अन्न देण्यात आले होते, ना पाणी—अशी अमानुष परिस्थिती होती.
ही जनावरे कत्तलीसाठी ठेवण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनास्थळावरून सुमारे १ लाख ९५ हजार रुपये किमतीची ११ जनावरे जप्त करण्यात आली. जप्त केलेली जनावरे पुढील देखभाल आणि संरक्षणासाठी धंतोली येथील गोरक्षण केंद्रात हलविण्यात आली आहेत.
दरम्यान, या प्रकरणी जनावरांचे मालक कोण याबाबत तत्काळ माहिती मिळू शकली नाही. पोलिस शिपाई मोहनसिंग ठाकूर यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपींविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ (१९९५ सुधारणा), प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा १९६० तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आरोपींचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.








