अमरावती : अचलपूर-परतवाडा परिसरात उघडकीस आलेल्या आक्षेपार्ह व्हिडिओ आणि लैंगिक शोषण प्रकरणावर राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कठोर भूमिका घेतली आहे. या संपूर्ण प्रकरणाला सरकार अत्यंत गांभीर्याने घेत असून दोषींवर कडक कारवाई होणारच, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.
या घटनेनंतर तातडीने पोलिस प्रशासनाशी चर्चा करण्यात आल्याचे सांगत त्यांनी नमूद केले की, कोणत्याही आरोपीला पाठीशी घातले जाणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणाची दखल घेत सखोल तपासाचे निर्देश दिले आहेत.
दरम्यान, या प्रकरणामुळे अमरावती जिल्ह्यात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून आक्षेपार्ह व्हिडिओच्या माध्यमातून मुलींचे शोषण केल्याच्या आरोपांनी खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर तपास यंत्रणा अधिक सतर्क झाली असून संपूर्ण प्रकरणाची बारकाईने चौकशी सुरू आहे.
बावनकुळे यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि सामाजिक सलोखा राखावा. तसेच, या प्रकरणातील पीडितांना न्याय मिळवून देणे ही सरकारची प्राथमिकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावर काही तरुणींचे आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाले. या माध्यमातून मुलींना ब्लॅकमेल करून लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. सुरुवातीला भीतीमुळे पीडित पुढे येत नव्हत्या, मात्र पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल करत तातडीने कारवाई केली.
१८० मुली, ३५० व्हिडिओ – संघटित रॅकेटचा संशय-
या प्रकरणात १८० हून अधिक मुलींचे सुमारे ३५० आक्षेपार्ह व्हिडिओ तयार केल्याचा आरोप आहे. या व्हिडिओंच्या आधारे मुलींना देहव्यापारासाठी धमकावले जात असल्याची माहिती समोर येत आहे.
खासदार अनिल बोंडे यांनी यामागे मोठ्या संघटित टोळीचा हात असल्याचा गंभीर आरोप करत विशेष तपास पथक (SIT) स्थापन करून मकोका लावण्याची मागणी केली आहे.
मुख्यमंत्री स्तरावरही दखल-
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची दखल घेतली असून, पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. लोकप्रतिनिधींनी उपलब्ध पुरावे तपास यंत्रणेकडे सुपूर्द केले आहेत.








