Published On : Thu, Apr 9th, 2026
By Nagpur Today Nagpur News

तीन बस ऑपरेटरच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याचा निर्णय

मनपाच्या परिवहन समितीच्या बैठकीत एकमताने प्रस्तावाला मंजुरी
Advertisement

नागपूर: शहरात आपली बस सेवेचे संचालन करणाऱ्या तीन बस ऑपरेटरच्या ताब्यात असलेल्या बसचे चेसीस तसेच बसमधील साहित्य गहाळ झाल्याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करून तीनही ऑपरेटरसकडून एकूण ३२ लाख ३९ हजार ७१० रुपयांची वसुली करण्याचा निर्णय परिवहन समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

मनपाच्या परिवहन समितीची बैठक सभापती श्रीमती मंगला खेकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज (ता. 9) डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समितीच्या सभागृहात पार पडली. या बैठकीला समितीचे सदस्य श्री. किशोर कुमेरिया, श्री. विजय होले, श्रीमती अर्चना पडोळे, श्रीमती प्रमिला मथरानी, श्रीमती मंगला मस्के, श्रीमती रुपाली ठाकूर, श्रीमती पूजा पाठक, श्री. शैलेश रामसुंदर पांडे, श्री. दिनेश यादव, श्री. शकील पटेल यांच्यासह परिवहन व्यवस्थापक डॉ. मेघना वासनकर, परिवहन विभागाचे प्रशासकीय अधिकारी श्री. योगेश लुंगे उपस्थित होते.

Gold Rate
Apr 23 2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1,52,300 /-
Gold 22 KT ₹ 1,41,600 /-
Silver/Kg ₹ 2,48,000/-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनरुत्थान मिशन (जेएनयूआरएम) अंतर्गत नागपूर मनपाला शहर बस(आपली बस) सेवेसाठी २३७ बसेस मिळाल्या होत्या. या बसेसचे संचालन करण्यासाठी मनपाने मे. हंसा सिटी बस सर्विसेस, मे. आर. के. सिटी बस सर्विसेस व मे. ट्रॅव्हल टाईम सिटी बस सर्विसेस या तीन ऑपरेटरची नियुक्ती केली होती. यात हंसा सिटी बस सर्विसेसकडे ७९, आर. के. सिटी बस सर्विसेसकडे ७९ तर ट्रॅव्हल टाईम सिटी बस सर्विसेकडे ७९ बसेस संचालन करण्याची जबाबदारी होती. यापैकी मे. हंसा सिटी बस सर्विसेस यांच्या कडे ४९ मे. आर. के. सिटी बस सर्विसेस यांच्याकडे १५ व मे. ट्रॅव्हल टाईम सिटी बस सर्विसेस यांच्या कडे ५९ असे एकूण १२३ बसेसचे १५ वर्ष पूर्ण झाल्यामुळे निर्लेखन करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. या प्रक्रियेदरम्यान केलेल्या सर्वेक्षणात बसेस चेसीस व बसमधील काही साहित्य गहाळ असल्याचे निर्दशनास आले. यासंदर्भात कंपन्यांनी खुलासा करावा, अशी नोटीस बजावली आहे. परंतु, या तिन्ही ऑपरेटरनी नोटीसला उत्तर दिले नाही. या कंपन्यांनी कोणताही खुलासा न केल्याने या तिन्ही ऑपरेटरच्या विरोधात फौजदारी कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

परिवहन विभागाने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून या सर्व बसेसचे मूल्यांकन केले आहे. यानुसार हंसा सिटी बस सर्विसेसकडून १६ लाख ९९ हजार ४९० रुपये, मे. आर. के. सिटी बस सर्विसेसकडून ३ लाख ७७ हजार ९२० तर मे. ट्रॅव्हल टाईम सिटी बस सर्विसेसकडून ११ लाख ६२ हजार ३०० रुपयांची वसुली करण्याचे निश्चित केले आहे. या तिन्ही कंपन्यांनी वसुलीची रक्कम विहित कालावधीत मनपाकडे न भरल्यास आगामी देयकातून ही रक्कम मनपाच्या खात्यात वळती केली जाईल त्याचप्रमाणे या तिन्ही ऑपरेटरवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला.

सुरक्षा रक्षकांच्या नियुक्तीला मान्यता

मनपाच्या परिवहन डेपोमध्ये बस तसेच बस डेपोमधील मालमत्ताची सुरक्षितता लक्षात घेऊन मनपाच्या ७ बस डेपोमध्ये आणि मोरभवन १ व मोरभवन २ येथे ८७ खासगी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्याच्या प्रस्तावाला बैठकीत मान्यता देण्यात आली. हे सुरक्षा रक्षक तिन्ही पाळ्यांमध्ये उपरोक्त स्थळी उपलब्ध राहणार आहेत.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement