नाशिक : भोंदूगिरी प्रकरणामुळे राज्यभर चर्चेत आलेल्या अशोक खरातला न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दोन आठवड्यांपासून पोलीस कोठडीत असलेल्या खरातला मुदत संपल्यानंतर आज सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. प्रकरणाचे स्वरूप गंभीर असल्याने न्यायालयाने त्वरीत निर्णय देत त्याला कारागृहात पाठवण्याचे आदेश दिले.
न्यायाधीश बी. एन. ईचपुराणी यांच्या न्यायालयात ही प्रक्रिया पार पडली. तपास अधिकारी आणि सरकारी वकील उपस्थित असताना न्यायालयाने कागदपत्रांचा आढावा घेतला आणि कोणताही मोठा युक्तिवाद न होता अवघ्या काही मिनिटांत कोठडीचा आदेश दिला. हा आदेश सध्या दाखल असलेल्या पहिल्या गुन्ह्याशी संबंधित असून, इतर गुन्ह्यांबाबत पुढील सुनावणी होणार आहे.
विशेष तपास पथकाकडून खरातची चौकशी सुरू असून, तो वेगवेगळे मोबाईल क्रमांक वापरत असल्याचे उघड झाले आहे. या माध्यमातून अनेक नवीन बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणात त्याची पत्नीही संशयाच्या भोवऱ्यात असून ती सध्या फरार आहे. तिचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके कार्यरत आहेत.
दैवी शक्तींचा दावा करत लोकांची फसवणूक केल्याचे आरोप असलेल्या या प्रकरणामुळे नाशिकमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. काही राजकीय व्यक्तींशी त्याचे संबंध असल्याच्या चर्चाही रंगल्या आहेत. तपास यंत्रणा या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहत असून आणखी फसवणुकीचे प्रकार उघड होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी अंधश्रद्धेपासून दूर राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.










