नागपूर : शहरातील रामदास पेठ येथील केअर हॉस्पिटलच्याअसलेल्या फिरदोश चेंबर (G+2) इमारतीत मंगळवारी (३१ मार्च) मध्यरात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. रात्री सुमारे ११:०१ वाजता अग्निशमन विभागाला घटनेची माहिती मिळताच तात्काळ पथक घटनास्थळी रवाना झाले.
अग्निशमन दलाच्या दोन गाड्या (MH-31-AG-4924 आणि MH-31-FC-9530) काही मिनिटांतच घटनास्थळी दाखल झाल्या. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तत्परतेने कारवाई करत आग आटोक्यात आणली. या मोहिमेत पालवे, गूंगे, बावकर, वेद्य, कुहिकर, उके, भगत, सर्किटनेवार आणि समुद्र यांनी सहभाग घेतला.
प्राथमिक माहितीनुसार, इमारतीच्या टेरेसवर ठेवलेल्या फर्निचर व इतर ज्वलनशील साहित्यामुळे आग भडकली. लाकूड, प्लायवुड, दरवाजे-खिडक्यांचे फ्रेम आदी साहित्य जळून खाक झाले. या घटनेत सुमारे १० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज मालक असद फिरदोशी यांनी व्यक्त केला आहे.
सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अग्निशमन दलाने पाण्याचा मारा करून आग पूर्णपणे विझवली. पहाटे सुमारे १:२० वाजता गाड्या स्थानकात परतल्या.
आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून संबंधित पोलीस ठाण्यात अधिक तपास सुरू आहे.










