
नागपूर :नागपूरमध्ये एअरपोर्ट मेट्रो स्थानकाजवळील मेट्रो ट्रॅकवर सायाळ (साळिंदर) आढळल्याने पहाटेच्या सुमारास खळबळ उडाली. ही घटना ३० मार्च रोजी घडली असून वेळेवर लक्षात आल्याने मोठा अपघात टळला.
मेट्रो ट्रॅकवर सायाळ फिरताना दिसताच संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने माहिती देण्यात आली. त्यानंतर वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि सुमारे ५ किलोमीटरपर्यंत पाठलाग करत सायाळला पकडण्याची मोहीम राबवली.
वनरक्षक प्रतीक घाटे आणि चेतन बारस्कर यांनी जाळीच्या साहाय्याने अत्यंत दक्षतेने सायाळला जेरबंद केले. या कारवाईदरम्यान कोणतीही दुखापत न होता सायाळला सुरक्षितपणे ताब्यात घेण्यात आले.
नंतर या वन्यप्राण्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. या घटनेमुळे मेट्रो प्रशासन आणि वनविभागाच्या तत्परतेचे कौतुक होत आहे.
दरम्यान, नागरीकरणाच्या वाढत्या प्रभावामुळे वन्यप्राणी शहरात येण्याच्या घटना वाढत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे अशा घटनांसाठी अधिक सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
सायाळ प्राणी विषयी माहिती –
सायाळ (Porcupine) हा अंगावर तीक्ष्ण काटे असलेला एक सस्तन आणि निशाचर प्राणी आहे, जो मुख्यतः भारतात आढळतो. हा प्राणी ‘कुरतडणाऱ्या’ (Rodent) प्रजातीतील असून शाकाहारी आहे. सायाळ साधारणपणे ३ फूट उंचीचा असतो आणि स्वसंरक्षणासाठी आपले काटे वापरतो. हा प्राणी वन्यजीव कायद्यांतर्गत संरक्षित आहे.









