Published On : Thu, Mar 19th, 2026
By Nagpur Today Nagpur News

अहिल्यानगरातील ॲसिड हल्ल्यावर विधानसभेत संताप; स्थगन प्रस्ताव फेटाळल्याने गोंधळ!

आजी-माजी अध्यक्ष आमनेसामने
Advertisement
मुंबई : अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथे सहा वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या अमानुष ॲसिड हल्ल्याचे तीव्र पडसाद बुधवारी विधानसभेत उमटले. या गंभीर प्रकरणावर चर्चा घडवून आणण्यासाठी विरोधकांनी मांडलेला स्थगन प्रस्ताव अध्यक्षांनी नाकारल्याने विरोधी पक्ष संतप्त झाला आणि सभागृहात जोरदार गदारोळ झाला.
घटनेचा मुद्दा उपस्थित करताना विरोधी पक्षातील नेत्यांनी राज्यातील महिलांवरील आणि बालिकांवरील वाढत्या अत्याचारांबाबत सरकारला धारेवर धरले. संगमनेरमध्ये सहावीच्या वर्गात शिकणाऱ्या एका निष्पाप मुलीवर झालेला ॲसिड हल्ला हा मानवतेला काळीमा फासणारा प्रकार असल्याचे सांगत, राज्यात कायद्याचा धाक उरला आहे का, असा थेट सवालही उपस्थित करण्यात आला.
विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणात स्थानिक पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप करत कडक शब्दांत टीका केली. गुन्हेगारांवर कारवाई करण्याऐवजी काही अधिकारी भ्रष्टाचारात गुंतल्याचा आरोप करत त्यांनी पोलीस यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “जेव्हा रक्षकच निष्क्रिय होतात, तेव्हा गुन्हेगारांचे धाडस वाढते,” असे म्हणत त्यांनी सरकारवरही निशाणा साधला.
या विषयाचे गांभीर्य लक्षात घेत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सरकारला या घटनेची तातडीने दखल घेऊन सभागृहात सविस्तर निवेदन सादर करण्याचे निर्देश दिले. मात्र, स्थगन प्रस्ताव फेटाळल्यामुळे विरोधक अधिकच आक्रमक झाले.
भास्कर जाधव यांनी स्थगन प्रस्ताव हे विरोधकांचे प्रभावी शस्त्र असल्याचे सांगत, प्रस्ताव नाकारला तरी काही सदस्यांना बोलण्याची संधी देण्याची परंपरा असल्याची आठवण करून दिली. यावर अध्यक्षांनी वेळेच्या मर्यादेचा दाखला देत इतर सदस्यांना बोलू देण्याची मागणी नाकारली.
दरम्यान, नाना पटोले यांनी अध्यक्षांबाबत केलेल्या वक्तव्यावर सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी जोरदार आक्षेप घेतला. अध्यक्षांवर हेत्वारोप केल्याचा आरोप करण्यात आला. त्यावर पटोले यांनी आपण कोणताही आरोप केला नसून स्थगन प्रस्ताव का नाकारला याचे स्पष्टीकरण मागितल्याचे स्पष्ट केले. अखेर अधिक वेळ वाया जाऊ नये, असे सांगत अध्यक्षांनी या वादावर पडदा टाकला.
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement