
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाला आज एक महिना पूर्ण झाला असताना त्यांच्या विमान अपघाताबाबतचे प्रश्न आणि आरोप-प्रत्यारोप अद्याप सुरूच आहेत. आमदार रोहित पवार यांनी हा अपघात संशयास्पद असल्याचा दावा करत नागरी उड्डाण महासंचालनालय (DGCA) आणि संबंधित विमान कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाव न घेता रोहित पवार यांच्यावर टीका केली.
एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना फडणवीस म्हणाले, “अजित पवार यांच्या विमान अपघातावर कोणीही पतंगबाजी करू नये. अशा संवेदनशील घटनांमध्ये हवेत तीर मारण्याचा किंवा अंदाज लावण्याचा प्रयत्न टाळला पाहिजे.” त्यांनी पुढे सांगितले की, “ही अत्यंत संवेदनशील बाब आहे. अशा वेळी दिवंगत व्यक्तीची परिस्थिती आणि त्यांच्या कुटुंबाच्या प्रतिष्ठेचा विचार करणे आवश्यक आहे.”
मुख्यमंत्री म्हणाले, “आमदार रोहित पवार माझी भेट घेऊन काही मुद्दे मांडले. त्यांनी दिलेल्या पत्रासोबत माझे पत्र जोडून मी DGCA कडे सखोल चौकशीची मागणी करणार आहे. मात्र, या प्रकरणात अनावश्यक विधानबाजी होऊ नये. अशा घटनांवर राजकारण करणे योग्य नाही.”
दरम्यान, सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्तीबाबत विचारलेल्या प्रश्नावर फडणवीस यांनी स्पष्ट केले की, “सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याचा निर्णय हा आमचा नसून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आहे. त्या निर्णयात आमच्या पक्षाची कोणतीही भूमिका नव्हती. NCP च्या नेत्यांनी तो निर्णय घेतला आणि आम्हाला कळवले. त्यांनी आवश्यक कागदपत्रे सादर केली. त्यांच्या विनंतीनुसार आम्ही तो निर्णय मान्य केला.”
राज्यात अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या राजकीय घडामोडींना वेग आला असून, विमान अपघाताच्या चौकशीची मागणी आणि त्यावरून सुरू असलेली टीका-प्रत्युत्तरे यामुळे राजकीय वातावरण तापले आहे.








