
मुंबई : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत सखोल चौकशीची मागणी सातत्याने करणारे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना मुख्यमंत्री कार्यालयातून (CM Office) फोन आल्याची माहिती समोर आली आहे. या घडामोडीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
रोहित पवार यांनी अपघात हा केवळ अपघात नसून त्यामागे इतर कारणे असू शकतात, अशी शंका व्यक्त करत स्वतंत्र व निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे. बुधवारी त्यांनी मुंबईतील पोलिस ठाण्यात जाऊन Directorate General of Civil Aviation (DGCA) विरोधात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी एफआयआर नोंदवून घेण्यास नकार दिल्याने त्यांच्यात वाद झाला.
दरम्यान, मुख्यमंत्री कार्यालयातून आलेला फोन हा पोलिस तक्रारीसंदर्भात नसल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे. हा संवाद अजित पवार यांच्या स्मारक उभारणीच्या प्रस्तावासंदर्भात असल्याची माहिती पुढे आली आहे. रोहित पवार यांनी यापूर्वी बारामती तसेच मुंबईतील शासकीय निवासस्थानी अजित पवार यांचे स्मारक उभारण्याची मागणी केली होती. या प्रकल्पासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात निधी तरतूद करण्याबाबत चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.
याच पार्श्वभूमीवर रोहित पवार लवकरच बारामती तालुका पोलिस ठाण्यात जाऊन पुन्हा DGCA विरोधात तक्रार दाखल करणार असल्याचे समजते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते पोलिस ठाण्याबाहेर मोठ्या संख्येने जमले आहेत. मुंबई पोलिसांनी एफआयआर नोंदवण्यास नकार दिल्यानंतर आता बारामती पोलिसांची भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या प्रकरणी पक्षाकडून पत्रकार परिषद घेण्याचेही नियोजन करण्यात आले असून, पुढील राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे.








