
नागपूर : ब्रिटिश एअरवेजच्या बोईंग 787 या प्रवासी विमानाची मंगळवारी नागपूरात आपत्कालीन लँडिंग करण्यात आली. लंडनहून हैदराबादकडे निघालेले हे विमान खराब हवामानामुळे हैदराबाद विमानतळावर उतरू शकले नाही. त्यानंतर पर्यायी व्यवस्था म्हणून नागपूरचा पर्याय निवडण्यात आला.
विमान नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे सुरक्षितपणे उतरवण्यात आले. लँडिंगनंतर विमानात तांत्रिक बिघाड असल्याचे स्पष्ट झाले. विशेषतः जीपीएस प्रणाली व्यवस्थित कार्यरत नसल्याची माहिती वैमानिकाने एअर ट्रॅफिक सर्व्हिस (एटीएस) विभागाला दिली होती.
विमानात एकूण १६९ प्रवासी प्रवास करत होते. सुदैवाने सर्व प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. खबरदारीचा उपाय म्हणून प्रवाशांना विमानातून सुरक्षित बाहेर काढण्यात आले.
दरम्यान, संबंधित यंत्रणांनी तात्काळ हालचाल करत प्रवाशांच्या निवास आणि भोजनाची व्यवस्था नागपूरातील हॉटेलमध्ये केली आहे. तांत्रिक तपासणी पूर्ण झाल्यानंतर पुढील उड्डाणाबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती विमानतळ प्रशासनाकडून देण्यात आली.
या घटनेमुळे काही काळ विमानतळावर हालचाल वाढली होती; मात्र प्रशासनाच्या तत्परतेमुळे परिस्थिती नियंत्रणात राहिली.








