
नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी शिवानी दाणी-वाखरे यांची नियुक्ती करण्यात आल्याने शहराच्या राजकारणात महिला नेतृत्वाचा ठसा अधिक गडद झाला आहे. त्यांच्या निवडीबद्दल विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, महापालिकेत महिलांना निर्णायक जबाबदाऱ्या देण्याच्या निर्णयाचे स्वागत होत आहे.
नागपूर महानगरपालिका येथे यापूर्वीच महापौर पद महिला आरक्षणातून देण्यात आले होते. उपमहापौरपदाची धुरा देखील महिलेकडे सोपवण्यात आली आहे. त्यानंतर स्थायी समितीसह परिवहन समिती आणि इतर दहा महत्त्वाच्या समित्यांचे नेतृत्व महिलांकडे देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे मनपात ‘महिलाराज’ची ठळक छाप पडताना दिसत आहे.
या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भारतीय जनता पक्षने महिलांच्या नेतृत्वक्षमतेवर विश्वास दाखवत हा पुढाकार घेतला आहे. नागपूर ही ‘संघभूमी’ म्हणून ओळखली जाते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघचे मुख्यालय येथे असल्याने येथील राजकीय घडामोडींना राज्यात आणि देशात विशेष महत्त्व असते. त्यामुळे नागपूरमधून दिलेला महिला नेतृत्वाचा हा संदेश व्यापक परिणाम करणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
महापौर नीता ठाकरे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “महिलांना केवळ प्रतिनिधित्व देणे हा उद्देश नाही, तर त्यांना सक्षम निर्णयक्षमता दाखवण्याची संधी देणे हे आमचे धोरण आहे. महिला नेतृत्वामुळे प्रशासनात अधिक संवेदनशीलता आणि पारदर्शकता येईल.”
महिला सक्षमीकरणाच्या दिशेने उचललेले हे पाऊल स्वागतार्ह असून, इतर राजकीय पक्षांनीही सकारात्मक भूमिका घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. शिवानी दाणी-वाखरे यांच्या नेतृत्वात स्थायी समिती शहराच्या विकासासाठी ठोस आणि दूरदृष्टीपूर्ण निर्णय घेईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.








