
नागपूर : पंजाबी लाईन झोपडपट्टी परिसरात गुरुवारी दुपारी बालअपहरणाचा धक्कादायक प्रयत्न उघडकीस आला. गड्डीगोदाम हद्दीत येणाऱ्या या भागात चार महिलांनी एका लहान मुलाला फूस लावून पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र आईच्या प्रसंगावधानामुळे आणि धाडसामुळे मोठा अनर्थ टळला.
ही घटना जरीपटका पोलिस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात घडली. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला परिसरात संशयास्पद हालचाली करत फिरत होत्या. खेळत असलेल्या मुलाजवळ जाऊन त्यांनी त्याला जवळ घेण्याचा आणि सोबत नेण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार लक्षात येताच मुलाच्या आईने तत्काळ धाव घेत आरडाओरडा केला. तिच्या हाकेला प्रतिसाद देत स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत चारही महिलांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.
घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. संतप्त नागरिकांनी कठोर कारवाईची मागणी करत पोलिस ठाण्यात गर्दी केली. जरीपटका पोलिसांनी आरोपी महिलांना ताब्यात घेऊन सखोल चौकशी सुरू केली असून, त्यांच्या हालचाली व संभाव्य टोळीबाबत तपास करण्यात येत आहे.
दरम्यान, या प्रकारामुळे परिसरातील पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. एका आईच्या जागरूकतेमुळे तिचे मूल सुरक्षित राहिले; मात्र अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी सर्वांनीच सजग राहणे आवश्यक आहे.
अनोळखी व्यक्तींवर लक्ष ठेवा, मुलांना एकटे सोडू नका आणि कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ पोलिसांना कळवा, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. सतर्कता हाच सुरक्षिततेचा खरा आधार आहे.








