
मुंबई : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत दरमहा मिळणाऱ्या ₹१५०० आर्थिक सहाय्याबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. ई-केवायसी (e-KYC) पूर्ण न करणाऱ्या महिलांचा लाभ आता कायमचा बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे लाखो लाभार्थी महिलांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
राज्यभरातील पात्र महिलांना या योजनेतून दर महिन्याला आर्थिक मदत दिली जाते. मात्र शासनाने ई-केवायसी अनिवार्य केले होते. ३१ डिसेंबर २०२५ ही ई-केवायसी पूर्ण करण्याची अंतिम मुदत होती. या कालावधीत ज्या महिलांनी प्रक्रिया पूर्ण केली आहे, त्यांनाच पुढे लाभ मिळणार आहे. मुदत उलटल्यानंतरही ई-केवायसी न केलेल्या महिलांचे हप्ते थांबवण्यात येणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे.
चुका महागात; दुरुस्तीसाठी अखेरची संधी
काही महिलांनी ई-केवायसी केली असली तरी कागदपत्रांतील विसंगती, बँक खात्याची चुकीची माहिती किंवा आधार क्रमांकाशी न जुळणारी नोंद यामुळे त्यांचे अर्ज अपूर्ण राहिले आहेत. अशा लाभार्थ्यांना पुन्हा एकदा ई-केवायसी दुरुस्त करण्याची संधी देण्यात आली आहे.
शासनाने ३१ मार्चपर्यंतची मुदत दिली असून, या कालावधीत चुका दुरुस्त करणे आवश्यक आहे. अन्यथा संबंधित महिलांचा लाभ कायमचा बंद होऊ शकतो.
घरोघरी पडताळणी; अपात्रांवर कारवाई-
दरम्यान, पात्रतेची खातरजमा करण्यासाठी प्रशासनाकडून घरोघरी जाऊन पडताळणी मोहीम राबवली जाणार आहे. उत्पन्न निकष, कागदपत्रांची वैधता आणि इतर अटींची तपासणी केली जाईल. पडताळणीत अपात्र ठरलेल्या महिलांचा लाभ तत्काळ बंद करण्यात येणार आहे.
काय करावे?
त्वरित ई-केवायसी स्थिती तपासा-
आधार व बँक खात्याची माहिती जुळते का ते खात्री करा
स्थानिक सेतू/महासेवा केंद्रात संपर्क साधून त्रुटी दुरुस्त करा
३१ मार्चपूर्वी प्रक्रिया पूर्ण करा-
लाडकी बहीण योजनेतील आर्थिक मदत अनेक कुटुंबांसाठी महत्त्वाची ठरली आहे. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांनी दिलेल्या मुदतीत सर्व प्रक्रिया पूर्ण करून आपला हक्काचा लाभ सुरक्षित ठेवावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.








