Published On : Tue, Feb 10th, 2026
By Nagpur Today Nagpur News

चंद्रपूर महापौरपदावर भाजपाची बाजी; संगीता खांडेकर यांचा अटीतटीचा विजय,काँग्रेसला एका मताने धक्का

Advertisement

चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्तानाट्याला अखेर पूर्णविराम मिळाला असून, महापौरपदी भाजपाच्या संगीता खांडेकर विराजमान झाल्या आहेत. आज पार पडलेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या उमेदवार सोनाली महाडूळे यांचा अवघ्या एका मताने पराभव करत विजय मिळवला.

६६ सदस्यांच्या सभागृहात मतदानाच्या वेळी वंचित बहुजन आघाडीचे दोन नगरसेवक गैरहजर राहिले, तर एमआयएमच्या एका नगरसेवकाने तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बहुमताचा आकडा ३२ वर आला. या स्थितीत संगीता खांडेकर यांना ३२ मते मिळाली, तर सोनाली महाडूळे यांना ३१ मतांवर समाधान मानावे लागले.

Gold Rate
Feb 10th, 2026 - Time 11.45Hrs
Gold 24 KT ₹ 1,56,800/-
Gold 22 KT ₹ 1,45,800 /-
Silver/Kg ₹ 2,61,300 /-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मागील महिन्यात झालेल्या महापालिका निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता, तर भाजपाला सत्तेपासून दूर राहावे लागले होते. एकूण ६६ जागांपैकी काँग्रेसने २७, भाजपाने २३, उद्धव ठाकरे गटाने ६, शेकापने ३, वंचितने २, अपक्षांनी २, बसपाने १, शिंदे गटाने १ आणि एमआयएमने १ जागा जिंकली होती. मात्र कोणालाही स्पष्ट बहुमत न मिळाल्याने महापालिकेत त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली होती.

या राजकीय गणितात उद्धव ठाकरे गट निर्णायक ठरला. मात्र काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी, विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर समर्थकांतील वाद यामुळे सत्तास्थापनेचा मार्ग अडखळला. उद्धवसेनेच्या महापौरपदावरील ठाम भूमिकेमुळे काँग्रेसला अपेक्षित यश मिळू शकले नाही.

अखेर महापौर निवडणुकीच्या दिवशी भाजप आणि उद्धवसेना यांच्यात सत्ता वाटपाचा करार झाला. या करारानुसार प्रत्येकी सव्वा वर्षांसाठी महापौरपद देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार पहिल्या सव्वा वर्षासाठी भाजपाच्या संगीता खांडेकर यांची निवड करण्यात आली, तर उपमहापौरपद उद्धवसेनेला देण्यात आले.

निवडणुकीआधी भाजपाने अधिकृत व्हीप जारी करत कडक भूमिका घेतली होती. आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने शिस्तबद्ध मतदानावर भर दिला. दुसरीकडे काँग्रेसने उद्धवसेनेला सोबत घेण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले, मात्र मंगळवारी (१० फेब्रुवारी) आमदार किशोर जोरगेवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर उद्धवसेनेने उपमहापौरपद स्वीकारत समझोत्याला अंतिम रूप दिले.

अवघ्या एका मताने ठरलेल्या या निकालामुळे चंद्रपूरच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, भाजपाचा हा विजय सत्तासमीकरणे बदलणारा ठरल्याचे चित्र आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement