
अकोला – मुंबईत प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या निवासस्थानावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडवून दिली असतानाच, या प्रकरणाला आता विदर्भाशी जोडणारा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. या फायरिंग प्रकरणात अकोला कनेक्शन समोर आल्याने तपास यंत्रणांची चिंता वाढली असून, विदर्भातही एकच खळबळ उडाली आहे.
या प्रकरणानंतर सोशल मीडियावर एक धमकीवजा पोस्ट व्हायरल झाली असून, त्यात कुख्यात लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित शुभम लोणकर याने या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारल्याचा दावा करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार शुभम लोणकर हा अकोला तालुक्यातील एका गावाचा रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे.
घटनेनंतर काही वेळातच सोशल मीडियावर आलेल्या पोस्टमध्ये शुभम लोणकर आणि अर्शदुल बिश्नोई यांची नावे घेत रोहित शेट्टी यांच्या घरावर गोळीबार केल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. या पोस्टमध्ये “हा फक्त ट्रेलर असून पुढच्या वेळी थेट बेडरूमपर्यंत गोळ्या पोहोचतील,” अशी गंभीर धमकी देण्यात आल्याने सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडाली आहे.
या धमकीनंतर पोलीस व सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर गेल्या आहेत. विशेष म्हणजे शुभम लोणकर याला यापूर्वी पुण्यातील वाघोली परिसरातून अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र आता या प्रकरणात जबाबदारी स्वीकारल्याचा दावा पुढे आल्याने अकोला जिल्हा पोलीस, राज्य पोलीस तसेच केंद्रीय तपास यंत्रणांनी संयुक्तपणे सखोल तपास सुरू केला आहे.
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार शुभम लोणकर याचे नाव यापूर्वीही अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये पुढे आले आहे. त्याचे आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी नेटवर्कशी काही संबंध आहेत का, याचाही तपास केला जात असून या प्रकरणात आणखी मोठे धागेदोरे उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या घटनेनंतर रोहित शेट्टी यांच्या निवासस्थानी आणि परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून, संपूर्ण प्रकरणावर तपास यंत्रणांचे बारकाईने लक्ष आहे.








