
नागपूर : राजकीय वर्तुळातील अनेक तर्क-वितर्कांना छेद देत भारतीय जनता पक्षाने नागपूर महानगरपालिकेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची नवी टीम जवळपास निश्चित केली आहे. अधिकृत घोषणा येत्या २ फेब्रुवारी रोजी होणार असली, तरी विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सत्तेची सूत्रे कुणाच्या हाती जाणार हे स्पष्ट झाले आहे.
दक्षिण नागपूरमधून निवडून आलेल्या सौ. नीता ठाकरे या नागपूरच्या पुढील महापौर असतील, तर मध्य नागपूरचे नगरसेवक ॲड. संजय बालपांडे यांची उपमहापौरपदी निवड होण्याची दाट शक्यता आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्रातील तरुण नगरसेविका शिवानी दाणी यांच्याकडे महापालिकेच्या तिजोरीची चावी देत त्यांची स्थायी समिती सभापती म्हणून निवड केली जाणार असल्याची माहिती आहे.
दरम्यान, सर्वाधिक २५ नगरसेवक निवडून आणणाऱ्या पूर्व नागपूर मतदारसंघातील ज्येष्ठ नगरसेवक नरेंद्र उर्फ बाल्या बोरकर यांची सत्तापक्ष नेता म्हणून निवड निश्चित मानली जात आहे. अंतिम क्षणी काही नावांमध्ये बदल होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.
राजवाडा पॅलेसमधील बैठक ठरली निर्णायक-
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच सर्व भाजप आमदारांच्या उपस्थितीत राजवाडा पॅलेसमध्ये झालेल्या नवनिर्वाचित नगरसेवकांच्या बैठकीत या नावांवर शिक्कामोर्तब झाले. महापौरपदासाठी सुरुवातीला शिवानी दाणी यांचे नाव चर्चेत असले तरी अखेर अनुभवी नीता ठाकरे यांच्यावर पक्ष नेतृत्वाने विश्वास टाकला.
उत्तर नागपूरचा हात रिकामा-
यंदा महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीत उत्तर नागपूरला डावलण्यात आल्याचे चित्र आहे. या भागातील नगरसेवकांना परिवहन, आरोग्य यांसारख्या समित्यांच्या सभापतीपदावर समाधान मानावे लागण्याची शक्यता आहे.
पाच वर्षांत चार महिला महापौर-
बैठकीत ठरलेल्या नियोजनानुसार महापौर व उपमहापौरांचा कार्यकाळ सव्वा-सव्वा वर्षांचा असेल. त्यामुळे पाच वर्षांत नागपूरला चार महिला महापौर व चार उपमहापौर मिळणार आहेत. तर स्थायी समिती सभापती आणि सत्तापक्ष नेत्यांचा कार्यकाळ प्रत्येकी एक वर्षाचा राहणार आहे.
उपमहापौरपदासाठी ॲड. संजय बालपांडे यांचे नाव पुढे आले असले, तरी ते हे पद स्वीकारतील की नाही याबाबत साशंकता आहे. मात्र वरिष्ठ नेत्यांच्या निर्णयानुसार मिळालेले पद स्वीकारणे अपरिहार्य ठरणार असल्याचे पक्षातील जाणकारांचे म्हणणे आहे.
नागपूर महापालिकेच्या सत्ताकेंद्रात नेमकी कोणती दिशा ठरते, याकडे आता शहराचे लक्ष लागले आहे.








