
नागपूर : ऑपरेशन थंडर अंतर्गत गुन्हे शाखेच्या युनिट–५ ने मोठी कारवाई करत नागपूर–भंडारा महामार्गावरील पardi पोलीस ठाण्याच्या हद्दीत कपासी परिसरात ५ किलो गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली असून ओडिशातील गांजा पुरवठादार सध्या फरार आहे.
३० जानेवारी रोजी पहाटे ३.५० ते सकाळी ६.५० या वेळेत पोलीस निरीक्षक विनायक गोल्हे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी गस्तीदरम्यान सिल्व्हर रंगाची टोयोटा इनोव्हा कार (क्रमांक MH 31 CR 3747) थांबवून तपासणी केली असता कारमधून गांजासह रोख रक्कम, मोबाईल फोन व इतर साहित्य जप्त करण्यात आले. एकूण जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे ६ लाख ४७ हजार ८८० रुपये इतकी आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे फैजान फिरोज अन्सारी (२६), अहमद अहमद खान (३२), मोहम्मद शाहिद अनवरुल हक (२९) आणि फिरदोस खान (४०) अशी असून सर्वजण कामठी, नागपूर येथील रहिवासी आहेत.
चौकशीत आरोपींनी गांजा ओडिशातील कटाबांजी येथील ‘रवि भाई’ या व्यक्तीकडून घेतल्याची कबुली दिली आहे. संबंधित पुरवठादार सध्या फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके कार्यरत आहेत.
या प्रकरणी पारडी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याच्या कलम ८ (क), २० (ब) (ii) (बी) व २९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.








