
नागपूर : देशात सध्या द्वेष, फूट आणि असहिष्णुतेला खतपाणी घातले जात असताना, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे सत्य आणि अहिंसेचे विचारच भारताची एकता आणि अखंडता टिकवू शकतात. या मूल्यांकडे पाठ फिरवणे हे देशाच्या भवितव्यासाठी धोकादायक ठरेल, असा इशारा नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांनी दिला.
शहीद दिनानिमित्त व्हरायटी चौक येथे महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. हा कार्यक्रम नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटी आणि जागतिक अहिंसा दिवस आयोजन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.
यावेळी बोलताना विकास ठाकरे म्हणाले की, गांधींच्या विचारांवर उभा असलेला भारत हा सर्वसमावेशक, लोकशाही मूल्यांवर आधारित आणि संविधानाशी बांधील आहे. मात्र सत्तेसाठी आज संविधानिक मूल्ये दुर्बल करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. अशा परिस्थितीत सत्य, अहिंसा, समता, बंधुता आणि सामाजिक न्यायासाठी काँग्रेसचा संघर्ष सुरूच राहील, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमात उपस्थित काँग्रेसचे नेते, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी गांधीजींच्या विचारांचा अंगीकार करण्याचा संकल्प घेत देशातील लोकशाही व्यवस्था, राष्ट्रीय एकात्मता आणि संविधानाचे संरक्षण करण्याचा निर्धार केला.
या कार्यक्रमाला माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, विधान परिषदेचे आमदार अभिजीत वंजारी यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.








