
मुंबई: बुधवारचा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अत्यंत धक्कादायक ठरला. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजितदादा पवार यांचे भीषण विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. या घटनेनंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला असून, सरकारमधील महत्त्वाच्या खात्यांबाबत आणि नेतृत्वाबाबत चर्चांना उधाण आले आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर आता राज्याचा आगामी अर्थसंकल्प नेमका कोण सादर करणार, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्याचबरोबर उपमुख्यमंत्रीपदासाठी सुनेत्रा पवार यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेली खाती आणि संपूर्ण मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
छगन भुजबळ–फडणवीस भेटीमुळे चर्चांना उधाण-
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी दाखल झाल्याने राजकीय चर्चांना अधिकच वेग आला आहे. या भेटीत मंत्रिमंडळ फेरबदल, उपमुख्यमंत्रीपदासाठी सुनेत्रा पवार यांचे नाव तसेच राष्ट्रवादीकडील खात्यांबाबत सविस्तर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मंत्रिमंडळ फेरबदलाची शक्यता अधिक-
अजित पवार यांच्या निधनानंतर मंत्रिमंडळात बदल होणार, अशी शक्यता अधिक बळावली आहे. त्यांच्या ताब्यात असलेली महत्त्वाची खाती राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर मंत्र्यांकडे सोपवण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुख्यमंत्र्यांना औपचारिक पत्र दिले जाणार असून, त्यानंतर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे माध्यमांशी संवाद साधणार असल्याची माहिती आहे.
दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रिकरणावर अंतिम निर्णय लवकरच?
या सगळ्या घडामोडींमध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार का, याबाबत सुरू असलेली चर्चा. सूत्रांच्या माहितीनुसार, पवार कुटुंबातील प्रमुख नेते लवकरच एकत्र बसून यावर अंतिम निर्णय घेण्याची शक्यता आहे. या निर्णयात शरद पवार यांची भूमिका निर्णायक असणार आहे.
यापूर्वी झालेल्या चर्चांमध्ये अजित पवार गटाकडून स्वतः अजित पवार, तर शरद पवार गटाकडून शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, अमोल कोल्हे आणि शशिकांत शिंदे सहभागी होते. मात्र आता अजित पवार नसल्याने, कुटुंबस्तरावर निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
विजय वडेट्टीवार यांची सरकारवर टीका-
या सगळ्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. “कोणाला कोणतं खातं मिळतं, हे मला माहीत नाही. मात्र भाजपला सर्व काही स्वतःकडेच ठेवायचं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ऊर्जा, गृह, जीएडीसारखी महत्त्वाची खाती असून ते संपूर्ण राज्यभर दौरे करत आहेत. राज्यातील कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती पाहता प्रशासन पूर्णपणे कोलमडल्याचे स्पष्ट होते,” असा आरोप त्यांनी केला.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात, हीच जनभावना-
अजित पवार यांच्या निधनानंतर सर्वसामान्य नागरिकांपासून राजकीय कार्यकर्त्यांपर्यंत शोककळा पसरली आहे. याचवेळी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र यावेत, अशी जनभावना असल्याचे मत अनेक नेत्यांनी व्यक्त केले आहे. राष्ट्रवादी नेते राजेश टोपे यांनीही दोन्ही पक्ष एकत्र येणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. “अजित दादा हयात असताना त्यांचीही तीच इच्छा होती,” असे त्यांनी स्पष्ट केले.








