
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. २८ जानेवारी रोजी मुंबईहून बारामतीकडे येताना त्यांचे विमान बारामती विमानतळावर उतरण्याच्या तयारीत असतानाच धावपट्टीजवळ कोसळले. या भीषण अपघातात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. या घटनेचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, अचानक विमान एका बाजूला झुकून थेट शेतात कोसळल्याचे त्यामध्ये दिसत आहे. या अपघातानंतर झालेल्या मोठ्या स्फोटात सर्वांचा जागीच मृत्यू झाला.
अजित पवार यांच्या अचानक जाण्याने केवळ पवार कुटुंबीयांवरच नव्हे, तर संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. काल बारामतीसह राज्यात शोक पाळण्यात आला. बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
दरम्यान, महापालिका निवडणुकांमध्ये अजित पवार यांनी काका शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेससोबत लढण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्या निवडणुकांमध्ये अपेक्षित यश न मिळाल्याने त्यांनी आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरू केली होती. २८ जानेवारी रोजी बारामतीत त्यांच्या चार सभा नियोजित होत्या, पण त्याआधीच हा दुर्दैवी अपघात घडला.
अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पक्षाने निवडणूक प्रचार पूर्णपणे मर्यादित ठेवण्याचा निर्णय घेतला असून, कोणत्याही प्रचार सभा किंवा रोड शो घेण्यात येणार नाहीत. उमेदवारांना घरोघरी जाऊन फक्त पत्रकांच्या माध्यमातूनच प्रचार करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.
इतकेच नव्हे, तर निवडणूक जिंकल्यानंतरही कोणत्याही प्रकारची विजय मिरवणूक काढू नये, असेही पक्षाने स्पष्ट केले आहे. अजित पवार यांच्या निधनाने राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला असून, त्याचवेळी तोंडावर आलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमुळे पक्षासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.








