
बारामती : बारामती येथे झालेल्या विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलेल्या वक्तव्यावर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तीव्र शब्दांत टीका केली आहे.
ममता बॅनर्जी मेंटली पॅरालाईज्ड झाल्या आहेत.आज राजकीय विधाने करण्याचा दिवस नाही. कृपया आज अशा कलंकित कर्मकांडांपासून दूर राहा,अशी टीका बावनकुळे यांनी केली आहे.
आज राजकीय आरोप-प्रत्यारोप करण्याचा दिवस नाही. अशा दुःखद घटनेवर कलंकित आणि असंवेदनशील विधाने करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही,” असे स्पष्ट शब्दांत बावनकुळे म्हणाले.
एखाद्याच्या मृत्यूचा राजकीय फायद्यासाठी वापर करणे अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्ह असल्याचे सांगत, ममता बॅनर्जी यांचे विधान अयोग्य असल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला. सध्या राजकारण करण्याची वेळ नसून, दिवंगत आत्म्याला श्रद्धांजली अर्पण करण्याची आणि शोकाकुल कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी होण्याची वेळ असल्याचे त्यांनी नमूद केले.
अजित पवार यांच्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात असून, अशा संवेदनशील प्रसंगी जबाबदारीने आणि संयमाने वक्तव्य करणे अपेक्षित असल्याचेही बावनकुळे यांनी सांगितले.








