नागपूर : नागपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२०२६ च्या घोषित निकालानंतर महापौर व उपमहापौर पदासाठी निवडणूक घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासाठी शुक्रवारी, ६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे. ही सभा रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात पार पडणार आहे.
महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी पिठासीन अधिकारी म्हणून विभागीय आयुक्त किंवा त्यांचे प्रतिनिधी असतील, अशी तरतूद महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम व शासन अधिसूचनांनुसार करण्यात आली आहे. त्यानुसार, नागपूर विभागाचे विभागीय आयुक्त डॉ. विपीन इटनकर (भा.प्र.से.), जिल्हाधिकारी नागपूर यांची या विशेष सभेसाठी पिठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
सदर निवडणूक प्रक्रिया नियमानुसार पार पाडण्याची जबाबदारी पिठासीन अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली असून, सभेचे इतिवृत्त शासन व संबंधित कार्यालयास सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे नागपूर महानगरपालिकेतील सत्तास्थापनेची प्रक्रिया अधिकृतरीत्या पुढे सरकली असून, शहराच्या राजकारणात मोठ्या घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.









