नागपूर : हज व उमराहसारख्या पवित्र यात्रांच्या नावाखाली शेकडो भाविकांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जनता फाउंडेशनचे अध्यक्ष झीशान सिद्दीकी यांनी प्रेस क्लबमध्ये घेतलेल्या पत्र परिषदेत या प्रकरणाचा सविस्तर खुलासा केला. एम.एम. टूर्सचा संचालक एजाझ अन्सारी आणि त्याच्या कुटुंबीयांनी धार्मिक भावना दुखावत हज-उमराह टूरच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
नोंदवण्यात आलेल्या एफआयआरमध्ये सुरुवातीला ६५ पीडितांचा समावेश असून, फसवणुकीची रक्कम ५५ लाख रुपयांहून अधिक आहे. मात्र योग्य तपास झाल्यास ही रक्कम किमान २ कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकते, असा दावा झीशान सिद्दीकी यांनी केला आहे.
ही बाब ८ जानेवारी रोजी एका गटाला उमराहसाठी रवाना व्हायचे होते, तेव्हा समोर आली. मात्र त्याआधीच ५ जानेवारीपासून एजाझ अन्सारी बेपत्ता झाला. कोणताही मार्ग न उरल्याने पीडितांनी जनता फाउंडेशनकडे धाव घेतली. त्यानंतर ६ जानेवारी २०२६ रोजी झीशान सिद्दीकी यांच्यासह सर्व पीडित तहसील पोलीस ठाण्यात पोहोचले.
तहसील पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मेंढे यांनी प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन तीन दिवसांत गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार ९ जानेवारी रोजी एजाझ अन्सारी, मोहम्मद साफे, एजाझ पटेल तसेच एजाझ अन्सारीची पत्नी यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच दिवशी एजाझ अन्सारीचा मुलगा साफे याला ताब्यात घेण्यात आले. एक दिवसाच्या पोलीस कोठडीनंतर त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले.
यानंतर १७ जानेवारी रोजी मुख्य आरोपी एजाझ अन्सारी याला तहसील पोलिसांनी अटक केली. माननीय न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पत्र परिषदेत बोलताना झीशान सिद्दीकी म्हणाले की, अजूनही अनेक पीडित त्यांच्याशी संपर्क साधत आहेत. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती मोठी असून, सर्व संबंधितांची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. एकाहून अधिक लोकांची फसवणूक झाल्याने एजाझ अन्सारीवर एमपीआयडी कायद्यान्वये कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणानंतर अल्पसंख्यक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी घेतलेल्या पुढाकाराचे विशेष कौतुक करण्यात आले. पीडितांचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी प्यारे खान यांनी स्वतःच्या खर्चाने पीडितांना उमराहसाठी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. याबद्दल झीशान सिद्दीकी व सर्व पीडितांनी कृतज्ञता व्यक्त केली असून, “ज्यांच्या माध्यमातून आम्हाला अल्लाहचे घर पाहण्याची संधी मिळत आहे, त्या प्यारे खान यांना प्रत्येक पीडित व त्यांच्या कुटुंबीयांकडून भरभरून दुआ दिली जात आहे,” अशी भावना व्यक्त करण्यात आली.









