
नागपूर – “आता मला थांबायचंय…”, या शब्दांत विधान परिषदेचे आमदार संदीप जोशी यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केला आहे. भाजपचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून ओळख निर्माण केलेल्या जोशी यांनी पक्षांतर्गत वाढलेली स्पर्धा, सत्तेसाठी सुरू असलेले पक्षांतर आणि संधीसाधूपणा यामुळे आपण बाजूला होण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे.
आपण आजही स्वतःला भाजपचा सामान्य कार्यकर्ता मानतो, मात्र तरुणांना संधी मिळावी यासाठी स्वतःची जागा रिक्त करणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी मांडले. “मी आता ५५ वर्षांचा आहे. नव्या पिढीला पुढे येण्यासाठी मार्ग मोकळा करून देणे हीच काळाची गरज आहे,” असे त्यांनी पत्रात नमूद केले.
आमदार संदीप जोशी यांची विधान परिषदेची मुदत १३ मे रोजी संपुष्टात येणार आहे. तोपर्यंत आमदार म्हणून असलेली सर्व घटनात्मक, नैतिक आणि सार्वजनिक कर्तव्ये पूर्ण जबाबदारीने पार पाडणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र १३ मेनंतर आमदारकी स्वीकारणार नसल्याचा ठाम निर्णय त्यांनी जाहीर केला आहे. पक्षाने संधी दिली तरी ती नम्रपणे नाकारून एखाद्या तरुण, सामान्य कार्यकर्त्याला ती जबाबदारी द्यावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
या निर्णयाबाबत त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माफी मागत, पक्षाने दिलेल्या संधींसाठी कृतज्ञता व्यक्त केली. “चार वेळा नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, महापौर आणि विधान परिषदेचे सदस्य अशी जबाबदारी देऊन पक्षाने या सामान्य कार्यकर्त्याचा सन्मान केला,” असे त्यांनी नमूद केले.
राजकारणातून निवृत्त होत असले तरी सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातील कार्य सुरूच राहणार असल्याचे जोशी यांनी स्पष्ट केले. ‘सोबत पालकत्व प्रकल्प’, ‘दीनदयाल थाळी प्रकल्प’, गोसेवा, आरोग्य व क्रीडा क्षेत्रातील विविध संघटनांमधील जबाबदाऱ्या ते पुढेही निभावणार आहेत.
“कुर्सी नाही, किंमत वाचवायला निघालो आहे. शोर नाही, सुकून निवडला आहे,” या शब्दांत त्यांनी आपल्या निर्णयाची भूमिका स्पष्ट केली. आपली अनुपस्थिती कुणाच्या आड येणार नाही आणि आपल्या असण्यामुळे कुणावर अन्याय होऊ नये, याच भावनेतून हा निर्णय घेतल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
आमदार संदीप जोशी यांच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असून, भाजपमध्ये एका अनुभवी नेत्याचा सक्रिय राजकारणातून घेतलेला हा स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.








