
नागपूर – महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण तापले असतानाच भाजप उमेदवार भूषण शिंगणे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट शिंगणे यांच्या घरी जाऊन भेट घेतली आणि हल्लेखोरांना कडक शब्दांत इशारा दिला.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “भूषण शिंगणे यांच्यावर झालेला हल्ला हा केवळ एका उमेदवारावरचा नाही, तर कोणत्याही कार्यकर्त्यावर हल्ला झाला असता तरी मी त्याच्या घरी गेलो असतो. शिंगणे माझे मित्र आहेत, मात्र ही केवळ मैत्रीची बाब नाही. अशा प्रकारची गुंडगिरी अजिबात खपवून घेतली जाणार नाही.”
मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्याचे सांगत ठोस कारवाईचे संकेत दिले. तसेच गिट्टीखदान पोलीस ठाण्यात हल्ल्याबाबत दुपारीच तक्रार देण्यात आली होती, मात्र पोलिसांकडून हलगर्जीपणा झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “या प्रकरणात पोलिसांचीही चौकशी होईल आणि आवश्यक ती कारवाई केली जाईल,” असेही त्यांनी सांगितले.
भाजप उमेदवारावर जीवघेणा हल्ला; काँग्रेसवर आरोप-
नागपूर महापालिका निवडणुकीच्या पूर्वसंध्येलाच प्रभाग क्रमांक ११ मध्ये हिंसाचाराची घटना घडली. भाजपचे उमेदवार भूषण शिंगणे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला असून या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर आणि नाकावर जोरदार मार लागला असून हात फ्रॅक्चर झाला आहे. सध्या त्यांच्यावर नागपूरच्या मेयो शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या हल्ल्यामागे प्रभाग ११ मधील काँग्रेस उमेदवार व त्याच्या समर्थकांचा हात असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. या घटनेनंतर शहरातील राजकीय वातावरण अधिकच चिघळले आहे.
राज ठाकरे आणि ‘भगवा ब्रिगेड’वर फडणवीसांचे प्रत्युत्तर-
दरम्यान, बोगस मतदानाच्या मुद्द्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मनसेप्रणित ‘भगवा ब्रिगेड’वरही मुख्यमंत्री फडणवीस यांनी जोरदार टीका केली. “ही ब्रिगेड काही निवडक भागांतच दिसते. मालवणीसारख्या मुस्लिमबहुल भागात ती का दिसत नाही? यांची दहशत ही सिलेक्टिव्ह आहे,” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
“मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात कोणाचीही दहशत चालणार नाही. कोणी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तर पोलीस त्यांना ठेचून काढतील,” असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला.
दुबार मतदारांच्या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले, “दुबार मतदार शोधण्याचे काम निवडणूक आयोगाचे आहे. यांचे पोलिंग एजंट मतदान केंद्रात बसलेले आहेत, त्यांनीच दुबार मतदार ओळखले पाहिजेत. मतदान कमी व्हावे यासाठीच असे आरोप आणि गोंधळ घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत.”
नागपूरमध्ये दिलेल्या या स्पष्ट आणि आक्रमक भूमिकेमुळे निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.








