
नागपूर :निवडणूक ही लोकशाहीची मूलभूत प्रक्रिया असून मतदान करणे हे प्रत्येक नागरिकाचे पहिले कर्तव्य आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मतदान केल्यानंतर ते पत्रकारांशी संवाद साधत होते.
लोकशाहीत जनतेने सक्रिय सहभाग घ्यायला हवा. जनहिताचा विचार करून जो उमेदवार योग्य वाटतो, त्याला मत देणे आवश्यक आहे. त्यामुळेच मतदानाच्या दिवशी सकाळी सर्वप्रथम मतदानाचा हक्क बजावणे हे प्रत्येकाने करायला हवे, असे भागवत यांनी स्पष्ट केले.
मतदानासाठी नागरिकांनी घराबाहेर पडणे गरजेचे असल्याचे सांगताना त्यांनी निवडणूक आयोगासह विविध स्तरांवरून सातत्याने याचे आवाहन केले जात असल्याचे नमूद केले. मतदानानंतर निकाल जो काही लागेल, तो लोकशाही प्रक्रियेचा भाग असतो, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, ‘नोटा’बाबत भूमिका स्पष्ट करताना भागवत म्हणाले की, सर्व उमेदवारांना नकार देणे म्हणजे अप्रत्यक्षपणे नको असलेल्या पर्यायाला संधी देण्यासारखे ठरते. ‘नोटा’ हा नागरिकांच्या नाराजीचा पर्याय असू शकतो; मात्र देशाच्या कारभारासाठी “कोणीच नाही” ही अवस्था अधिक घातक ठरते. अराजक म्हणजेच राजा नसणे ही सर्वात वाईट परिस्थिती असल्याचे पितामह भीष्मांचे उदाहरण देत त्यांनी याकडे लक्ष वेधले.
दरम्यान, राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी आज मतदान प्रक्रिया सुरू असून, मुंबईसह एकूण २८६९ जागांसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या रिंगणात १५ हजारांहून अधिक उमेदवार आपले भवितव्य आजमावत आहेत.








