नागपूर: महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवत नागपूर पोलिसांकडून सघन कॉम्बिंग ऑपरेशन राबवले जात आहे. याच मोहिमेदरम्यान पांचपावली पोलिसांनी बापूकुटी नगर परिसरात धडक कारवाई करत अवैध शस्त्रांचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणात एका युवकाला अटक करण्यात आली असून, त्याचे नाव कमलेश तांबे असे आहे.
पोलिसांनी संशयावरून केलेल्या झडतीत आरोपीच्या घरातून बेकायदेशीर शस्त्रे आढळून आली. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्राथमिक चौकशीत कमलेश तांबे याने पोलिसांना सांगितले की, वर्ष २०२२ मध्ये त्याच्या भावाचा मृत्यू झाला असून ही शस्त्रे त्यानेच घरात ठेवली होती. मात्र, शस्त्रांची माहिती असूनही आरोपीने याबाबत पोलिसांना कोणतीही सूचना दिली नव्हती.
पोलिसांना आरोपीच्या जबाबावर संशय असून तो तपास दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. निवडणूक काळात अशा प्रकारे शस्त्रसाठा सापडणे गंभीर बाब मानली जात असून, या प्रकरणाकडे पोलिसांकडून विशेष लक्ष दिले जात आहे.
दरम्यान, पांचपावली पोलिसांनी आरोपीविरोधात आर्म्स अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. जप्त करण्यात आलेली शस्त्रे कोणत्या उद्देशाने वापरण्यात येणार होती, तसेच या प्रकरणामागे आणखी कोणी सहभागी आहे का, याचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.










