
नागपूर : नागपूर महानगर पालिका निवडणुका लवकरच पार पडणार आहे. यासाठी सर्व पक्षाच्या उमेदवारांनी तयारी सुरू केली. नरेंद्र नगर प्रभाग क्रमांक ३५-अ मध्ये जमिनीवर उतरून नागरिकांशी संवाद साधला असता समोर आलेली वस्तुस्थिती धक्कादायक आहे. या प्रभागातून भाजपचे उमेदवार संदीप गवई यांच्याविरोधात मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त होताना दिसत आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, गेल्या अनेक वर्षांत प्रभागात ठोस विकासकामे झालेली नाहीत. रस्त्यांची दुरवस्था, पाणीपुरवठ्याची समस्या, अस्वच्छता आणि ड्रेनेजसारख्या मूलभूत प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष झाल्याचा आरोप नागरिक करत आहेत. लोकांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी उमेदवाराने प्रत्यक्षात फारसे प्रयत्न केले नाहीत, अशी भावना प्रभागात ठळकपणे जाणवत आहे.
यामुळेच “जमिनीवर काम दिसत नसेल, तर पुन्हा तिकीट कशासाठी?” असा सवाल आता खुलेपणाने उपस्थित केला जात आहे. नागरिक स्वतःला फसवले गेल्याची भावना व्यक्त करत असून, सत्ताधारी पक्षाविरोधात असंतोष वाढताना दिसतो आहे.
दरम्यान, काँग्रेसकडून गौतम गाणार यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले आहे. त्याचबरोबर अपक्ष उमेदवार अरविंद तुपे यांनाही स्थानिक पातळीवर चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.
नरेंद्र नगरमधील जनता आता बदलाची भाषा बोलू लागली आहे. “या वेळी मतदान पक्षाच्या नावावर नव्हे, तर कामाच्या आधारावर होईल,” असा ठाम सूर नागरिकांकडून ऐकायला मिळत आहे.
आता ही वाढती नाराजी मतदानाच्या दिवशी कोणत्या दिशेने वळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








