Published On : Tue, Dec 30th, 2025
By Nagpur Today Nagpur News

नागपूरमधील हॉटेलात भीषण शोकांतिका; एका कुटुंबावर कोसळला दुहेरी आघात

Advertisement

महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूरमधून मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. बेंगळुरू येथील एका नवविवाहित तरुणाने नागपूरमधील हॉटेलच्या खोलीत आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून, या घटनेनंतर त्याच्या आईनेही विष प्राशन करून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला आहे. सूरज शिवण्णा असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. तर त्यांची आई जयंती शिवण्णा यांची प्रकृती अत्यंत गंभीर असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सूरज आणि त्यांची आई काही दिवसांपूर्वी बेंगळुरूहून नागपूरला आले होते. वर्धा रोडवरील एका नामांकित हॉटेलमध्ये त्यांनी मुक्काम केला होता. शनिवारी सूरजने हॉटेलच्या खोलीतील छताच्या पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना घडत असतानाच, मुलाचा मृत्यू पाहून आईनेही टोकाचे पाऊल उचलत विष प्राशन केले. हॉटेल कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला, मात्र तोपर्यंत सूरजचा मृत्यू झाला होता. प्राथमिक तपासात कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याचे समोर येत आहे.

Gold Rate
31 dec 2025
Gold 24 KT ₹ 1,34,100/-
Gold 22 KT ₹ 1,24,700 /-
Silver/Kg ₹ 2,38,000/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

सूरजचा विवाह गणवी हिच्याशी २९ ऑक्टोबर २०२५ रोजी मोठ्या थाटामाटात पार पडला होता. लग्नानंतर दोघेही हनिमूनसाठी श्रीलंकेला गेले होते. मात्र तिथेच दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले आणि हनिमून अर्धवट सोडून त्यांना भारतात परतावे लागले. मायदेशी परतल्यानंतर गणवीच्या माहेरच्या लोकांनी सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केले. सासरी सतत मानसिक छळ आणि अपमान होत असल्याचा आरोप करत गणवी मानसिक तणावात होती.

या मानसिक त्रासाला कंटाळून गणवीने काही दिवसांपूर्वी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. उपचारादरम्यान डॉक्टरांनी तिला ब्रेनडेड घोषित केले होते. व्हेंटिलेटरवर उपचार सुरू असताना गुरुवारी तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर गणवीच्या पालकांनी सूरज आणि त्याच्या कुटुंबीयांविरोधात हुंड्यासाठी छळ आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा बेंगळुरूमध्ये दाखल केला होता. या प्रकरणामुळे सूरजवर सामाजिक दबाव वाढला होता आणि त्याच्या अटकेची मागणी करत नातेवाईकांनी निदर्शनेही केली होती.

या सगळ्या घडामोडींमुळे घाबरून सूरज आपल्या आईसह नागपूरला आला होता. मात्र इथेच त्याने जीवन संपवण्याचा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. या घटनेची माहिती सूरजचा भाऊ संजय शिवण्णा याने नागपूर पोलिसांना दिली. सध्या नागपूर पोलीस बेंगळुरू पोलिसांच्या संपर्कात असून संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. एका नव्या संसाराची अशी शोकांतिका झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement