पुणे/पिंपरी-चिंचवड : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट कायम राहणार, अशी चर्चा रंगलेली असतानाच रविवारी अचानक नवे राजकीय चित्र समोर आले आहे. काका–पुतण्या पुन्हा एकत्र येत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक एकत्र लढणार असल्याची अधिकृत घोषणा खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे.
पुणे महापालिकेसाठी राष्ट्रवादीची युती अयशस्वी ठरल्याचे वृत्त दोन दिवसांपूर्वी चर्चेत होते. शनिवारी तर शरद पवार गट महाविकास आघाडीसोबतच मैदानात उतरणार असल्याची चर्चा होती. मात्र रविवारी झालेल्या बैठका आणि भेटीनंतर परिस्थिती झपाट्याने बदलली. आमदार रोहित पवार आणि खासदार अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या हालचालींना वेग आला.
यानंतर पिंपरी-चिंचवडमध्ये जाहीर सभेत बोलताना अजित पवार यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची ‘घड्याळ’ आणि ‘तुतारी’ ही दोन्ही चिन्हे एकत्र लढणार आहेत. “हा निर्णय म्हणजे परिवार पुन्हा एकत्र आणण्याच्या दिशेने टाकलेलं पाऊल आहे. अनेक कार्यकर्त्यांच्या मनातही हीच अपेक्षा होती,” असे अजित पवार यांनी नमूद केले.
पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार यावर आता अंतिम शिक्कामोर्तब झाले आहे. अमोल कोल्हे आणि रोहित पवार यांनी अजित पवार गटासोबत सलग तीन बैठका घेतल्या असून, त्यानंतर संयुक्त लढतीचा निर्णय पक्का झाला आहे. दोन्ही गटांच्या उमेदवारांची एकत्रित यादी आज जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, भाजपने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्धार जाहीर केला आहे. “अबकी बार १२५ पार” असा नारा देत भाजपने सर्व १२५ जागांवर विजय मिळवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. विरोधकांच्या केवळ काहीच जागा निवडून येतील, असा दावाही भाजपकडून केला जात आहे.
भाजपच्या या भूमिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. भाजपचा अति आत्मविश्वास आणि घमेंड त्यांनाच अडचणीत आणेल, अशा शब्दांत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. आगामी निवडणुकीत या नव्या राजकीय समीकरणांचा नेमका काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








