
नागपूर – जिल्ह्यातील शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी तपास यंत्रणांनी कारवाई अधिक तीव्र केली असून, आणखी एका शिक्षणाधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे माजी शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकर यांना विशेष तपास पथकाने (SIT) ताब्यात घेतले आहे.
शालार्थ ऑनलाइन वेतन प्रणालीचा गैरवापर केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली असून, सायबर सेलच्या तपासात तब्बल १२ कोटी रुपयांहून अधिक रकमेचा अपहार झाल्याचे समोर आले आहे. नागपूर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या तक्रारीनंतर प्रकरणाचा उलगडा झाला.
या तक्रारीच्या आधारे सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, प्रकरणाचा सखोल तपास एसआयटीकडून सुरू आहे. चौकशीत शालार्थ प्रणालीत बेकायदेशीर हस्तक्षेप करून बनावट शालार्थ आयडी व ड्राफ्ट तयार केल्याचे निष्पन्न झाले आहे. या बनावट आयडीच्या माध्यमातून अस्तित्वात नसलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नावावर वेतन आणि देणी काढण्यात आली, त्यामुळे शासनाच्या तिजोरीला मोठा फटका बसला.
शिक्षक भरती घोटाळा : आतापर्यंत २६ जणांना अटक
या प्रकरणात आतापर्यंत एकूण २६ आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यामध्ये शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, लिपिक, मुख्याध्यापक, शाळा संचालक तसेच शिक्षकांचा समावेश आहे. सर्व आरोपींविरुद्ध प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालय क्रमांक १० मध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
ताज्या कारवाईत रवींद्र शंकरराव काटोलकर यांना मंगळवारी अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना २५ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. २०२१ ते २०२२ या कालावधीत नागपूर जिल्हा परिषदेत शिक्षणाधिकारी पदावर कार्यरत असताना, बनावट माहितीची जाणीव असूनही कोणतीही पडताळणी न करता पगार प्रस्तावांना मंजुरी दिल्याचा तसेच वैयक्तिक लाभासाठी शासनाचे आर्थिक नुकसान केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.








