
नागपूर – गेल्या काही दिवसांपासून सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरांमध्ये सातत्याने चढउतार पाहायला मिळत असून, आता ही भाववाढ विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. जळगावच्या सराफा बाजारात सलग दुसऱ्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरांनी नवे उच्चांक गाठले आहेत.
माहितीनुसार, एका दिवसातच सोन्याच्या दरात २ हजार ७०० रुपयांची वाढ झाली, तर चांदीच्या दरात तब्बल ५ हजार रुपयांची उसळी नोंदवली गेली. या वाढीनंतर जीएसटीसह सोन्याचा दर १० ग्रॅमसाठी १ लाख ४० हजार ८० रुपये इतका झाला असून, चांदीचा दर जीएसटीसह २ लाख १६ हजार ३०० रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचला आहे.
गेल्या दोन महिन्यांचा विचार केला तर सोन्याच्या दरात एकूण ११ हजार ५०० रुपयांची, तर चांदीच्या दरात तब्बल ५० हजार रुपयांची वाढ झाली आहे. जागतिक पातळीवरील आर्थिक अस्थिरता, गुंतवणुकीकडे वाढलेला कल आणि सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून सोन्या-चांदीला वाढती मागणी—या सगळ्यांचा थेट परिणाम दरवाढीवर होत असल्याचे सराफ व्यावसायिक सांगत आहेत.
या प्रचंड भाववाढीचा फटका थेट ग्राहकांना बसत आहे. दागिन्यांसाठी ठरवलेले बजेट कोलमडले असून, अनेकांनी खरेदी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. विशेषतः महिलांमध्ये आता सोन्या-चांदीऐवजी बेन्टेक्स किंवा कृत्रिम दागिन्यांकडे कल वाढताना दिसत आहे.
दरम्यान, सोन्याचा भाव अशीच झपाट्याने वाढत राहिला तर येत्या काळात या मौल्यवान धातूंचे दर नेमके कोणत्या पातळीवर पोहोचणार, याबाबत सराफ बाजारासह ग्राहकांमध्येही चिंता आणि कुतूहल निर्माण झाले आहे.








