
नागपूर – नागपूर शहर पोलिसांनी जून २०२५ पासून राबवलेल्या ‘ऑपरेशन यू-टर्न’ या विशेष मोहिमेमुळे रस्ते अपघातातील मृत्यू मोठ्या प्रमाणात घटले असून, या कामगिरीमुळे नागपूर शहराने महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या मोहिमेमुळे शेकडो नागरिकांचे प्राण वाचले असून रस्ते सुरक्षिततेच्या दिशेने नागपूरने ठोस पाऊल टाकले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या Committee on Road Safety मार्फत अपघात मृत्यूत किमान १० टक्के घट करण्याचे निर्देश देण्यात आले असून, दीर्घकालीन उद्दिष्ट म्हणून ‘शून्य अपघात मृत्यू’ हे ध्येय निश्चित करण्यात आले आहे. नागरिकांची सुरक्षितता हा मूलभूत हक्क असल्याचे अधोरेखित करत पायाभूत सुविधा, ब्लॅक स्पॉट दुरुस्ती, हेल्मेट व सीटबेल्ट सक्ती, बेकायदेशीर लाईट-सुटाया कारवाई आणि तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरावर भर देण्यात आला आहे. या राष्ट्रीय उद्दिष्टाशी सुसंगत अशी ठोस अंमलबजावणी नागपूर शहर पोलिसांनी केली आहे.
अपघात मृत्यूत घट; नागपूर अव्वल –
महाराष्ट्र पोलीस दलाच्या Additional Director General of Police (Traffic) कार्यालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, २०२४ च्या तुलनेत २०२५ मध्ये रस्ते अपघातातील मृत्यू कमी करण्यात नागपूर शहर राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर पिंपरी-चिंचवड (२० टक्के) आणि अमरावती शहर (१७ टक्के) यांचा क्रमांक लागतो.
३० नोव्हेंबर २०२५ पर्यंतच्या तुलनात्मक आकडेवारीनुसार अपघात मृत्यूत झालेली घट पुढीलप्रमाणे आहे.
नागपूर शहर – ८०
पुणे शहर – ५५
छत्रपती संभाजीनगर – १८
ऑपरेशन यू-टर्न अंतर्गत प्रमुख कारवाई
दारू पिऊन वाहन चालविण्यावर कडक कारवाई
दररोज ३,००० पेक्षा अधिक वाहनचालकांची तपासणी केली जात आहे. २०२५ मध्ये आतापर्यंत ५,३६६ प्रकरणे नोंदवली असून १०० टक्के दोषसिद्धी दर साध्य झाला आहे. पुनरावृत्ती करणाऱ्या आरोपींना १५ दिवसांचा कारावास ठोठावण्यात आला आहे. शहरात दररोज फिरत्या पद्धतीने ९० ठिकाणी नाकाबंदी लावण्यात येते.
रॅश व निष्काळजी वाहनचालना विरोधात कारवाई
अतिवेग, चुकीच्या बाजूने वाहन चालविणे, ट्रिपल सीट आणि बेदरकार वाहनचालना यावर विशेष पथके कार्यरत आहेत. दररोज सरासरी ६० पेक्षा अधिक वाहनचालकांवर BNS कलम २८१ अंतर्गत कारवाई होत असून, आतापर्यंत ८८० प्रकरणे नोंदवली गेली आहेत. दोषींना ताब्यात घेऊन वाहने जप्त केली जात आहेत.
अल्पवयीन वाहनचाशून्य सहनशीलता-
अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास परवानगी देणाऱ्या पालकांवर मोटार वाहन अधिनियम कलम १९९ अंतर्गत कारवाई केली जात आहे. २०२५ मध्ये आतापर्यंत ६० अल्पवयीन व पालकांवर कारवाई झाली असून सर्व प्रकरणांत १०० टक्के दोषसिद्धी झाली आहे. संबंधित अल्पवयीनांना भविष्यात परवाना मिळण्यास अपात्र ठरवण्यात आले आहे.
अपघातप्रवण क्षेत्रांवर विशेष उपाय-
नागपूर शहरातील अपघातप्रवण क्षेत्रे अधिसूचित करून तेथे अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे. तसेच स्पीड हंप, क्रॅश बॅरियर्स, अपघातप्रवण क्षेत्र दर्शवणारे फलक, रंबल स्ट्रिप्स व ब्लिंकर लाईट्स बसवण्यात आले आहेत.
पार्किंग व नो-पार्किंग शिस्त-
नागपूर महानगरपालिका व पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने पार्किंग व नो-पार्किंग क्षेत्रे निश्चित करून रस्त्यांवर स्पष्ट मार्किंग व विशेष बंदोबस्त लावण्यात आला आहे.
फूड ट्रक्स व सुधारित वाहनांवर कारवाई-
बेकायदेशीररीत्या रस्त्यावर उभ्या असलेल्या आणि नियमबाह्य बदल केलेल्या फूड ट्रक्सवर मोटार वाहन अधिनियम कलम ५२, १९०, ३९/१९२ अंतर्गत कारवाई करत २५ पेक्षा अधिक वाहने जप्त करण्यात आली आहेत.
खाजगी बस पार्किंगवर निर्बंध-
इनर रिंग रोडमध्ये खाजगी बस पार्किंगवर बंदी घालण्यात आली असून ३०० बसवर कारवाई करण्यात आली आहे. २० बसचे परवाने रद्द करण्याचे प्रस्ताव तसेच २ बस कंपन्यांचे ब्लॅकलिस्टिंग प्रस्तावित आहे.
जड वाहनांवर नियंत्रण-
इनर रिंग रोडच्या आत सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत जड वाहनांना प्रवेशबंदी आहे. मर्यादित वेळेत प्रवेश दिलेल्या वाहनांवरही कडक नियंत्रण ठेवण्यात आले असून २०,९०० जड वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.
पोलीस आयुक्तांचा संदेश-
“रस्ते सुरक्षितता म्हणजे केवळ कायद्याची अंमलबजावणी नव्हे, तर मानवी जीवनाचे संरक्षण आहे. ‘ऑपरेशन यू-टर्न’च्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयाच्या शून्य अपघात मृत्यू या उद्दिष्टाकडे नागपूर शहर ठाम पावले टाकत आहे. ही कामगिरी शिस्तबद्ध नागरिक आणि कर्तव्यदक्ष पोलीस दलामुळेच शक्य झाली आहे,असे पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल पत्रकार परिषदेत म्हणाले.
दरम्यान २२ ते ३१ डिसेंबरदरम्यान दारू पिऊन वाहन चालविण्यावर विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.
– दररोज एकूण १३१ नाकाबंदी पॉइंट्स
– हेल्मेट न वापरणाऱ्यांवर कठोर कारवाई
– चुकीच्या बाजूने वाहन चालविणे व ट्रिपल
– सीटविरोधात अधिक तीव्र कारवाई
– पादचाऱ्यांसाठी अधिक सुरक्षित क्रॉसिंग्स
नागपूर शहर पोलीस नागरिकांच्या सहकार्याने ‘शून्य अपघात मृत्यू’ हे ध्येय साध्य करण्यासाठी कटिबद्ध आहेत.








