
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी एमआयडीसी परिसरात असलेल्या आवादा (Avaada) कंपनीच्या आवारात झालेल्या भीषण दुर्घटनेत मृतांचा आकडा ६ वर पोहोचला असून, अनेक कामगार गंभीर जखमी झाले आहेत. मंगळवारी सकाळी काम सुरू असतानाच पाण्याची टाकी अचानक कोसळल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे.
दुर्घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. कोसळलेल्या टाकीखाली अनेक कामगार अडकले. माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल व आपत्कालीन पथके घटनास्थळी दाखल झाली. बचावकार्य तातडीने सुरू करण्यात आले. जखमी कामगारांना बुटीबोरी व नागपूरमधील विविध रुग्णालयांत उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पाण्याची टाकी कोसळून झालेल्या या दुर्घटनेत गंभीर जखमी असलेल्या अशोक पटेल, अरविंद कंचन पटेल आणि अरविंद मोहल ठाकूर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची पुष्टी करण्यात आली आहे.
अपघातानंतर स्थानिक प्रशासन व कामगार संघटनांनी सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. कंपनी परिसरातील कामकाजादरम्यान आवश्यक सुरक्षा उपायांची अंमलबजावणी झाली होती का, याबाबत चौकशीची मागणी होत आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलीस तपास सुरू असून नेमक्या कारणांचा शोध घेतला जात आहे.
राज्य सरकारकडून मृतांच्या कुटुंबीयांना मदत जाहीर होण्याची शक्यता असून, प्रशासनाने घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. दुर्घटनेमुळे औद्योगिक सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.








