
नागपूर : बुटीबोरी औद्योगिक वसाहतीतील आवादा (Avaada) कंपनीच्या परिसरात शुक्रवारी दुपारी भीषण अपघात घडला. कंपनीत सुरू असलेल्या कामादरम्यान निर्माणाधीन टँक टॉवर अचानक कोसळल्याने किमान तीन कामगारांचा मृत्यू, तर अनेक मजूर ढिगाऱ्याखाली दबले असल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली.
अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस, आपत्कालीन वैद्यकीय पथके आणि बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू असून क्रेन व जेसीबीच्या साहाय्याने ढिगारा हटवण्याचे काम सुरू आहे. जखमी मजुरांना तात्काळ बुटीबोरी येथील माया रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, रुग्णालय प्रशासनानुसार काही जखमींची प्रकृती चिंताजनक आहे.
दरम्यान, टँक टॉवर कोसळण्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, बांधकामातील दर्जा, सुरक्षा नियमांचे पालन झाले होते की नाही, तसेच कामगारांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या होत्या का, याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. स्थानिक पोलीस आणि कामगार विभागाने घटनेची चौकशी सुरू केली असून कंपनी व्यवस्थापनाकडूनही अंतर्गत तपास केला जात आहे.
महत्त्वाचे म्हणजे, नागपूर परिसरात गेल्या काही महिन्यांपासून औद्योगिक अपघातांची मालिका सुरूच आहे. यापूर्वी सप्टेंबर २०२५ मध्ये नागपूरपासून सुमारे ४० किलोमीटर अंतरावर चाकदो-बाजारगावजवळील सोलार ग्रुपच्या स्फोटक उत्पादन केंद्रात झालेल्या भीषण स्फोटात एका कामगाराचा मृत्यू तर २५ हून अधिक जण जखमी झाले होते. त्या स्फोटाचे हादरे दूरवर जाणवले होते.
सतत घडणाऱ्या अशा दुर्घटनांमुळे नागपूर जिल्ह्यातील धोकादायक उद्योगांमधील सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रशासनाकडून याप्रकरणी नेमकी कोणती कारवाई होते आणि दोषींवर कठोर पावले उचलली जातात का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.








