
नागपूर : काँग्रेस नेत्या डॉ. प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली असतानाच, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी भाजप व महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. इतर पक्षांतील नेत्यांना आमिषे दाखवून राजीनाम्यास भाग पाडले जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
नागपूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना नाना पटोले यांनी माणिकराव कोकाटे प्रकरणाचा संदर्भ देत सरकारच्या दुजाभावावर बोट ठेवले. “राहुल गांधी आणि सुनील केदार यांच्यावर खोट्या गुन्ह्यांची मालिका लादली जाते, मात्र कोकाटे दोषी ठरूनही त्यांना मंत्रीपद बहाल करण्यात आलं. हा सत्तेचा दुरुपयोग नाही तर काय?” असा सवाल पटोलेंनी उपस्थित केला.
यावेळी त्यांनी भाजपमधील अंतर्गत संघर्षाचाही उल्लेख केला. “भाजपमधलेच काही नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अडचणी वाढवत आहेत. शिवसेना फोडण्याचे प्रयत्न सुरू असून, त्यामागे सत्तेची लालसा आहे,” असा आरोप त्यांनी केला.
“भाजप सत्तेत आल्यानंतर ‘सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता’ हे दुष्टचक्र सुरू झालं आहे. जनतेच्या पैशाची लूट करून आमदार खरेदी करण्याचा प्रकार उघडपणे चालू आहे,” असा घणाघात नाना पटोलेंनी केला.
काँग्रेसच्या विचारधारेबाबत बोलताना पटोले म्हणाले, “काँग्रेसची विचारधारा संपवणं कोणाच्याही बापाच्या हातात नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसमुक्त भारताची घोषणा केली होती, पण आज वास्तवात काँग्रेसयुक्त भाजपचं चित्र देशभरात दिसत आहे.” ते पुढे म्हणाले, “काँग्रेस पुन्हा सत्तेत आली तर भाजप पूर्णपणे रिकामी होईल.”
नाना पटोलेंच्या या आक्रमक वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे असून, आगामी काळात आरोप–प्रत्यारोपांची धार अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.








