
नागपूर : बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या दुचाकी चोरीच्या प्रकरणाचा गुन्हे शाखा युनिट क्रमांक १ ने छडा लावला असून, ऐषआरामी जीवनशैलीसाठी वाहन चोरी करणाऱ्या एका तरुण सराईत आरोपीला अटक करण्यात आली आहे.
ही चोरी १ जुलै रोजी सकाळी ११ वाजेपासून २ जुलै रोजी पहाटे २.१५ वाजण्याच्या दरम्यान घडली. तक्रारदार अरुण विठोबाजी ठोंबरे (वय ५६, रा. कचोरे पाटील नगर) यांनी आपली हिरो होंडा स्प्लेंडर दुचाकी (क्रमांक MH-31 DL 5052, अंदाजे किंमत १५ हजार रुपये) घरासमोर लॉक करून ठेवली होती. मात्र रात्री अज्ञात चोरट्याने ती लंपास केली.
या प्रकरणी बेलतरोडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला. दरम्यान, गुन्हे शाखा युनिट-१ ने तांत्रिक विश्लेषण व मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार तपासाला गती दिली. गस्तीदरम्यान नंबर प्लेट नसलेली दुचाकी संशयास्पदरीत्या आढळून आल्याने पोलिसांनी ती अडवून चालकास ताब्यात घेतले.
तपासात आरोपीची ओळख तुषार राजेश राऊत (वय १९, रा. श्रीकृपा नगर, घोगली-बेसा रोड, नागपूर) अशी पटली. चौकशीत त्याने आपल्या साथीदार राज कौशिक याच्या मदतीने दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. ऐषआरामी खर्च भागवण्यासाठी तो वारंवार वाहन चोरी करत असल्याचेही पोलिसांनी सांगितले.
चोरीस गेलेली सुमारे १५ हजार रुपयांची दुचाकी आरोपीकडून जप्त करण्यात आली असून पुढील कारवाईसाठी त्याला बेलतरोडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. फरार सहआरोपीचा शोध सुरू असून, आरोपीचा इतर चोरीच्या गुन्ह्यांतील सहभाग तपासला जात आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल, अतिरिक्त पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अतिरिक्त आयुक्त (गुन्हे) वसंत परदेशी, उपायुक्त (डिटेक्शन) राहुल माणिककर आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) अभिजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. गुन्हे शाखा युनिट-१चे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भेडोडकर व त्यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई पार पाडली.








