
नागपूर : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. राज्य निवडणूक आयोगाने मुंबईसह राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम अधिकृतपणे जाहीर केला असून, १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान तर १६ जानेवारी रोजी मतमोजणी करून निकाल जाहीर केले जाणार आहेत.
एकाच टप्प्यात होणाऱ्या या निवडणुकांमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापणार असून, महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये थेट सामना रंगण्याची चिन्हे आहेत. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच राज्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.
निवडणूक कार्यक्रम असा असेल-
उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात : २३ डिसेंबर २०२५
अर्ज भरण्याची अंतिम तारीख : ३० डिसेंबर २०२५
अर्जांची छाननी : ३१ डिसेंबर २०२५
अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख : २ जानेवारी २०२६
निवडणूक चिन्ह वाटप : ३ जानेवारी २०२६
मतदान : १५ जानेवारी २०२६
मतमोजणी व निकाल : १६ जानेवारी २०२६
या निवडणुकांसाठी ३ कोटी ४८ लाखांहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून, १ जुलै २०२५ रोजीची अंतिम मतदार यादी ग्राह्य धरली जाणार आहे.
जात वैधता प्रमाणपत्राबाबत कडक अट-
आरक्षित जागांवरून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना जात प्रमाणपत्रासह वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. वैधता प्रमाणपत्र तत्काळ उपलब्ध नसल्यास, सहा महिन्यांच्या आत प्रमाणपत्र सादर करण्याचे हमीपत्र द्यावे लागेल. ही अट पूर्ण न केल्यास निवड रद्द होणार आहे.
नामनिर्देशन अर्ज ऑफलाईनच-
राजकीय पक्षांच्या मागणीनुसार नामनिर्देशन अर्ज ऑफलाईन पद्धतीनेच स्वीकारले जाणार आहेत. तसेच प्रचारात पारदर्शकता वाढवण्यासाठी स्टार प्रचारकांची संख्या २० वरून ४० करण्यात आली आहे.
राजकीय रणधुमाळीला सुरुवात-
मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, नाशिक, औरंगाबादसह इतर महापालिकांमध्ये सत्ता मिळवण्यासाठी सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या ३१ जानेवारी २०२६ पूर्वी निवडणुका पूर्ण करण्याच्या आदेशानुसार हा कार्यक्रम आखण्यात आला असून, या निवडणुकांचा राज्याच्या राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम होणार आहे.








