
नागपूर : हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विधानसभेच्या पायऱ्यांवर राजकीय तापमान चांगलेच वाढले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर उपरोधिक शैलीत जोरदार निशाणा साधत, त्यांनी एक नवे ‘ पांघरून खाते’ सुरू करावे असा टोमणाच लगावला.
पत्रकारांशी संवाद साधताना ठाकरे म्हणाले,
मुख्यमंत्र्यांनी आता ‘पांघरून खाते’ सुरू करावे. त्यामुळे इतर मंत्री पांघरून पाहून हातपाय पसरेल,या टिप्पणीने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली.
याच दरम्यान ठाकरे यांनी एक चारोळीही सादर करून मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर तिखट प्रहार केला.
“कोण होतास तू, काय झालास तू,
भ्रष्टांच्या छायेखाली झोपलास तू!”हिवाळी अधिवेशनभर सुरू असलेल्या वाद-संवादात ठाकरे यांच्या या नव्या टीकेने आणखी रंग भरला आहे.
उद्धव ठाकरे यांनी याचवेळी केंद्रीय मंत्री अमित शहा आणि भाजपावरदेखील आवाज उठवला.
“अमित शाह, भाजप किंवा संघ यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये,” असा थेट इशाराच त्यांनी दिला.
गेल्या आठवड्यात संसदेत ‘वंदे मातरम’ मुद्द्यावर झालेल्या गोंधळाचा उल्लेख करत ठाकरे म्हणाले.
“१५० वर्षांच्या ‘वंदे मातरम’वरून इतक्या वर्षांनी वाद कसा? भाजपाला आता का आठवलं? त्यांचं वंदे मातरम म्हणजे फक्त ‘वन डे मातरम’!”
सरकार विरोधी पक्षनेते पद देण्यास आम्हाला घाबरतेय-
विरोधी पक्षनेते पदाबाबत सरकारकडे अजूनही अनिश्चितता असल्याचा आरोप करत ठाकरे म्हणाले,
“२०० पेक्षा जास्त आमदार असूनही सरकार आम्हाला विरोधी पक्षनेते पद देण्यास घाबरतेय. उपमुख्यमंत्री पद असंवैधानिक असल्याचे सांगणारेच आज दोन उपमुख्यमंत्र्यांसह बसले आहेत. मग विरोधी पक्षनेते पद देण्यात काय अडचण?”
सरकारकडे केंद्राचा आशीर्वाद असूनही ते बचावात्मक भूमिकेत असल्याचा आरोप करत ठाकरे म्हणाले,जर विरोधी पक्षनेते पद द्यायचे नसेल, तर बिननंबराचे मंत्री ठेवू नये. कारण भाजपाच म्हणते. ‘एक नंबरला महत्त्व, बाकीला नाही.राजकीय तापमान वाढत असताना उद्धव ठाकरे यांच्या या तिखट विधानांमुळे अधिवेशनाचा वातावरण अधिकच ताणले गेले आहे.









