मुंबई – राज्यातील गाजत असलेल्या लाडकी बहीण योजनेबाबत मोठे धक्कादायक तथ्य समोर आले असून सरकारने तत्काळ पडताळणी सुरू केली आहे. निवडणुकीच्या तोंडावर सुरू झालेल्या या योजनेत महिलांना दरमहा 1500 रुपये मिळत असल्याने मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाले. मात्र, आता तपासात अनेकांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतल्याचे उघड झाले आहे.
महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी विधानसभेत दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील 9,526 महिलांनी अटी न पाळता योजनेचा लाभ घेत 14 कोटी 50 लाख रुपये मिळवले.
तर 14,298 पुरुषांनीच स्वतःला लाभार्थी दाखवून तब्बल 21.44 कोटी रुपये उचलल्याचे समोर आले. लाडकी बहीण योजनेत स्पष्ट नमूद होते की, इतर सरकारी योजनांचा लाभ घेत असल्यास नवीन योजनेत पात्रता मिळणार नाही. तसेच उत्पन्नाची मर्यादाही महत्त्वाची होती. अर्जांची संख्या प्रचंड असल्याने सुरुवातीला पडताळणीची प्रक्रिया नीटपणे होऊ शकली नाही आणि अनेकांनी याचाच गैरफायदा घेतल्याचे दिसते.
या सर्व प्रकरणी विभागांकडून वसुलीचे आदेश देण्यात आले असून संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. तपासात अडथळा आणणाऱ्यांना कोणतीही सूट मिळणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
राज्य सरकारने या गैरव्यवहाराला गांभीर्याने घेत तपासाची गती वाढवली असून येत्या काळात आणखी मोठ्या कारवायांची शक्यता वर्तवली जात आहे. राजकीय व प्रशासकीय वर्तुळात या घोटाळ्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.










