
नागपूर – हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी उद्धव ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. सत्ताधारी पक्षात दोन गट पडले असून त्यातील २२ आमदार मुख्यमंत्री फडणवीसांच्या पूर्ण प्रभावाखाली काम करतात, असा दावा त्यांनी केला.
पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, या आमदारांनी सांगितलेली सर्व कामे गेल्या वर्षभरात वेगाने मंजूर झाली आहेत. त्यांना हवा असलेला निधीही मिळाला असून, मुख्यमंत्री जे सांगतील त्याप्रमाणे हे आमदार वागतात, असे त्यांनी म्हटले. यातील एक जण स्वतःला ‘व्हाईस कॅप्टन’ म्हणवतो, असा टोला त्यांनी लगावला.
यानंतर आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या प्रवासावरूनही प्रश्न उपस्थित केले. चार्टर्ड विमानं, हेलिकॉप्टरद्वारे प्रवास आणि प्रचारादरम्यान नेल्या जाणाऱ्या बॅगांबद्दल त्यांनी शंका व्यक्त केली. “या बॅगांमध्ये नेमका कोणता ‘आनंदाचा माल’ असतो, हे जनतेलाही जाणून घ्यायचं आहे,” असे ते म्हणाले.
पर्यावरणाच्या विषयावरही त्यांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले. नाशिक, ठाणे आणि मुंबईतील झाडतोड, तसेच ताडोबा परिसरातील प्रकल्प पुन्हा सुरू झाल्याचा उल्लेख करत, “पर्यावरणाचा विचार न करता विकासाच्या नावाखाली सर्वत्र नुकसान होत आहे,” अशी टीका त्यांनी केली.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंची ही वक्तव्ये राजकीय चर्चेला नवीन वळण देणारी ठरली आहेत.









