
नागपूर – महाराष्ट्र विधानमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून औपचारिक सुरुवात झाली आहे. मात्र यंदाचे अधिवेशन अनेक कारणांनी विशेष ठरणार आहे. प्रथमच दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षनेता नसताना कामकाज पार पडणार असल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
विधिमंडळाच्या कामकाज पत्रिकेमध्ये विरोधी पक्षनेता निवडीचा कोणताही उल्लेख नसल्याने विरोधकांनी नाराजी व्यक्त केली आहे. दुसरीकडे, विधान परिषदेसाठी काँग्रेस पक्षाने सतेज पाटील आणि विधानसभेसाठी शिवसेना (ठाकरे गट) यांनी भास्कर जाधव यांच्या नावाची अधिकृत पत्रे सादर केली आहेत. मात्र ती नियुक्ती अद्याप अधिवेशनाच्या सूचीमध्ये दिसत नसल्याने गोंधळ अधिकच वाढला आहे.
दरम्यान, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांकडून सरकारला अनेक मुद्द्यांवर घेरण्याची शक्यता आहे. शेतकरी प्रश्न, अतिवृष्टीचे नुकसान, कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती, तसेच आरोग्य सेवा या विषयांवर तीव्र चर्चा होण्याचे संकेत आहेत.
सरकारकडून मात्र अधिवेशन सुरळीत पार पाडण्याचा प्रयत्न होणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. विरोधी पक्षनेता नसल्यामुळे चर्चेच्या प्रक्रियेत अनेक तांत्रिक अडचणी निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हिवाळी अधिवेशन पुढील काही दिवसांत किती तापणार, हे सर्वांचे लक्ष वेधून ठेवणार आहे.









