
नागपूर – शहरात पोलिस असल्याचे भासवून नागरिकांकडून दागिने व रोकड लंपास करणाऱ्या कुख्यात ईरानी टोळीतील एक महत्त्वाचा सदस्य अखेर तहसील पोलिसांच्या जाळ्यात अडकला. अटक केलेल्या आरोपीचे नाव बाघर मेहमूद अली (34, रा. ईरानी गली, परली वैजनाथ, बीड) असे असून त्याचे इतर साथीदार अद्याप फरार आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांच्या अनेक पथकांकडून मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू आहे.
एका दिवसात चार लुटीच्या घटना –
9 नोव्हेंबरला तहसील, जरीपटका, हुडकेश्वर आणि धंतोली परिसरात या टोळीने पोलिसांचा वेश धारण करून चार वेगवेगळ्या ठिकाणी नागरिकांची फसवणूक केली होती. ‘तपासाची गरज’ असल्याचे सांगत ते लोकांना थांबवत, दागिने उतरवून घेत आणि क्षणात पसार होत. लाखोंच्या मालावर हात साफ झाल्याने पोलिस दलातही मोठी खळबळ उडाली होती.
तांत्रिक तपासातून मिळाला ठोस धागा-
घटनांची माहिती एकत्रित केली असता पोलिसांना प्रारंभीच ईरानी टोळीचा संशय आला. मोबाइल लोकेशन, सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपी बीडमध्ये लपल्याचे समोर आले. त्यानंतर तहसील पोलिसांनी बीडमध्ये छापा टाकून बाघर मेहमूद अलीला पकडले.
अटकेवेळी विरोध, अधिकारी जखमी-
अटक प्रक्रियेदरम्यान आरोपीच्या कुटुंबियांनी पोलिसांना अडथळा निर्माण केला. धक्काबुक्की होत एक अधिकारी जखमीही झाला. तरीही पोलिसांनी धीर न सोडता आरोपीला ताब्यात घेत नागपुरात आणले.
न्यायालयीन कोठडी; चौकशी कठीण-
अटक झालेल्या आरोपीला न्यायालयाने न्यायिक कोठडीत पाठवले आहे. त्यामुळे तातडीने सखोल चौकशी शक्य झाली नाही. पोलिस आता आरोपीचा रिमांड मिळवून टोळीतील इतर सदस्यांची नावे, ठिकाणे आणि चोरलेल्या दागिन्यांचा तपशील मिळवण्याच्या तयारीत आहेत.
फरारी साथीदारांवर पोलिसांची पकड लवकरच?
पोलिसांच्या अंदाजानुसार, टोळीचे उर्वरित सदस्य नागपूर व आसपासच्या भागात लपलेले असण्याची शक्यता आहे. सर्व पोलीस ठाण्यांना सतर्कतेचा इशारा पाठवण्यात आला असून लवकरच संपूर्ण टोळीला पकडण्यात यश मिळेल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.









