
नागपूर – राज्याचे हिवाळी अधिवेशन अवघ्या तीन दिवसांवर आले असून सर्व यंत्रणांनी तयारीला अंतिम स्वरूप दिले आहे. येत्या 8 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या आठवडाभराच्या अधिवेशनाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. रवी भवनमधील मंत्रिमंडळ सदस्यांचे बंगले, आमदारांच्या निवासस्थानांची सजावट आणि स्वागताची तयारी वेगाने सुरु झाली आहे. 7 डिसेंबरपासून मंत्री-आमदार नागपूरला दाखल होणार असल्याने प्रशासन सतर्क आहे.
दरम्यान, या वर्षीच्या अधिवेशनादरम्यान आंदोलक संघटनांची मोठी गर्दी होत आहे. 33 हून अधिक मोर्चांना परवानगी मागितली असून, 22 संघटना धरणे आंदोलन, तर 17 संघटना साखळी उपोषण करण्याच्या तयारीत आहेत. दिंडोरा बॅरेज प्रकल्पग्रस्त, चंद्रपूर-यवतमाळ-वर्धा संघर्ष समित्यांनीही अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मोर्चाची मागणी केली आहे. एका व्यक्तीने तर आत्मदहनाची परवानगी मागितल्याची माहिती समोर आली आहे. पहिल्याच दिवशी पाच मोठे मोर्चे विधानभवनावर धडकणार असल्याने सुरक्षाव्यवस्थेला मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीची चर्चा-
शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे 11 आणि 12 डिसेंबरला अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत. या दोन दिवशी ते आपल्या आमदारांसोबत स्वतंत्र बैठक घेणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. अधिवेशनातील राजकीय घडामोडींवर त्यांची उपस्थिती महत्त्वाची मानली जात आहे.
शिक्षकांचा आक्रमक पवित्रा; टीईटी रद्द करण्याची मागणी-
दरम्यान, राज्यभरातील शिक्षक संघटना टीईटी परीक्षा बंधनकारक केल्याच्या निर्णयाविरोधात आक्रमक झाल्या आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील शिक्षकांनी 80-90 टक्के प्राथमिक शाळा बंद ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. माध्यमिक शिक्षक संघटनांनीही आंदोलनात सहभाग नोंदवला आहे. राज्य सरकारकडून तोडगा निघाला नाही तर हिवाळी अधिवेशनात नागपूरवर मोठा शिक्षक मोर्चा धडकेल, असा इशारा देण्यात आला आहे.
विदर्भातील दीर्घकाळ प्रलंबित प्रश्नांकडे शासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. नागपूर करारानुसार तीन आठवड्यांचे अधिवेशन घेणे अपेक्षित असतानाही फक्त सात दिवसांचे सत्र ठेवण्यात आले असल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “कापूस-धान-सोयाबीन-कांदा उत्पादकांच्या समस्या प्रलंबित असताना सात दिवसांचे अधिवेशन म्हणजे विदर्भाच्या प्रश्नांकडे केलेले दुर्लक्ष आहे,” असे देशमुख म्हणाले.
नागपुरात राजकीय तापमान वाढत असतानाच, अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर येणारे मोर्चे आणि नेत्यांच्या भेटीमुळे या आठवड्यात शहरात मोठी हालचाल होण्याची शक्यता आहे.









