
नागपूर – कामठी नगर परिषद निवडणुकीदरम्यान झालेल्या व्यापक बोगस मतदानाच्या प्रकरणामुळे राजकीय वातावरण प्रचंड दलदलीत सापडले आहे. बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या अध्यक्षा सुलेखा कुंभारे यांनी पत्रकार परिषद घेत भाजपसह महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर जोरदार टीका केली. “भाजपशी आमची कुठलीही युती नाही. सत्तेच्या हव्यासापोटी बावनकुळे लाचार झाले असल्याची टीकाही त्यांनी केली. सिव्हिल येथील प्रेस क्लबमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
बाहेरचे लोक, खोटी ओळखपत्रे, आणि संगनमताने मतदान-
कुंभारे यांनी गंभीर आरोप करत सांगितले की, २ डिसेंबर रोजी झालेल्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात बनावट मतदारांना आणून मतदान करण्याचा प्रयत्न करण्यात आला. “लोकशाहीची परंपरा पायदळी तुडवली गेली आहे. कामठीत जे झाले ते निवडणूक व्यवस्थेचा अपमान आहे. प्रशासनाने तातडीने उच्चस्तरीय चौकशी करावी,” अशी मागणी त्यांनी केली.
बावनकुळेंनी तात्काळ राजीनामा द्यावा —
बोगस मतदानामागे बावनकुळे यांचा थेट हस्तक्षेप असल्याचे पुरावे आमच्याकडे आहेत. मतदारांवर दबाव टाकणे, धमक्या देणे, पैशांचे वितरण — हे सर्व भाजपच्या नेतृत्वाखाली झाले,” असा थेट आरोप करत कुंभारे यांनी महसूल मंत्र्यांचा तात्काळ राजीनामा घेण्याची मागणी केली.
अजय अग्रवाल हा भाजपचा दलाल-
कामठीत भाजपने अजय अग्रवाल यांना उमेदवारी दिली होती, तर बहुजन रिपब्लिकन एकता मंचकडून अजय कदम मैदानात होते. “अभियानादरम्यान भाजपने मतदारांना धमक्या दिल्या, पैसे वाटले. अगदी मत खरेदीचा उघडपणे व्यवहार झाला,” असा गंभीर दावा कुंभारे यांनी केला.अजय अग्रवाल हा भाजपचा दलाल आहे,” असा थेट आरोपही त्यांनी केला.
निवडणूक आयोगाकडे तक्रार –
या संपूर्ण प्रकाराचा निषेध करून कुंभारे यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले असून कठोर कारवाईची मागणी केली आहे.दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास न्यायालयात जाण्याचा इशाराही त्यांनी दिला.कामठीतील राजकीय संघर्ष आता आणखी भडकण्याची चिन्हे दिसत असून, नगराध्यक्षपदाची लढत नव्या वादळाच्या केंद्रस्थानी आली आहे.









