
मुंबई – महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन यंदा ८ ते १४ डिसेंबर २०२५ या कालावधीत नागपूर येथे होणार आहे. विशेष म्हणजे, १३ डिसेंबर (शनिवार) आणि १४ डिसेंबर (रविवार) या शासकीय सुट्टीच्या दिवशीही दोन्ही सभागृहांचे कामकाज घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय आज झालेल्या विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत झाला.
विधानभवनात झालेल्या या बैठकीस विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यासह विविध मंत्रिमंडळातील सदस्य आणि दोन्ही सभागृहातील प्रमुख नेते उपस्थित होते.
बैठकीत अधिवेशनाचे कामकाज, शासनाच्या प्रलंबित विषयांवरील चर्चा आणि विविध महत्त्वाच्या निर्णयांवर विचारविनिमय करण्यात आला. नागपूर अधिवेशनादरम्यान सुट्टीच्या दिवशी कामकाज ठेवण्याचा निर्णय हा यावर्षीचा महत्त्वाचा ठरू शकतो, असे मानले जात आहे.
संविधानाच्या अमृत महोत्सवी वाटचालीवरील पुस्तकरूप प्रकाशन
या बैठकीत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आणखी एका महत्त्वाच्या कार्यक्रमाची माहिती दिली. ‘भारताच्या संविधानाची गौरवशाली अमृत महोत्सवी वाटचाल’ या विषयावर यंदा २६ मार्च रोजी अधिवेशनात झालेल्या चर्चेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या उत्तराचे पुस्तक स्वरूपातील संकलन तयार करण्यात आले आहे.
हे पुस्तक ९ डिसेंबर २०२५ रोजी राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात येणार आहे. महाराष्ट्र विधिमंडळ वि.स. पांगे संसदीय प्रशिक्षण केंद्राने हा उपक्रम राबवला आहे.
नागपूर अधिवेशनामुळे राज्याचे राजकीय वातावरण पुन्हा एकदा गतीमान होणार असून, अनेक महत्त्वाचे निर्णय अपेक्षित असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.









