मुंबई : महाराष्ट्रातील नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकांवर पुन्हा एकदा अनिश्चिततेचे सावट अढळले आहे. २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांचे मतदान पार पडले असले तरी निकालाची प्रतिक्षा आणखी वाढली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सर्व निकाल 21 डिसेंबरपर्यंत जाहीर न करण्याचे निर्देश दिल्याने उमेदवारांसह जनतेलाही प्रतीक्षा करावी लागणार आहे.
या निर्णयावर राज्यभरातून विविध प्रतिक्रिया उमटत असताना शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली. ठाण्यातील पक्षप्रवेश कार्यक्रमानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी केवळ एका वाक्यात कटाक्ष टाकत उत्तर दिलं. “निवडणूक आयोग आणि न्यायालय यावर न बोलेलंच चांगलं.”
शिवसैनिकांचा ओघ पुन्हा ठाकरे गटाकडे-
ठाण्यात आयोजित पक्षप्रवेश कार्यक्रमात अनेक माजी शिवसैनिकांनी ठाकरे गटात पुनरागमन केले. उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून सर्वांचे स्वागत करताना समाधान व्यक्त केले.ते म्हणाले, “धुळफेक केलेली आणि कट्टर शिवसैनिक हीच परत येतात. पक्षात येणाऱ्यांचे मनापासून स्वागत आहे.”
राजकारणातही प्रदूषण… भाजपला धडा शिकवण्यासाठी महाविकास आघाडी-
यावेळी त्यांनी वातावरणातील प्रदूषणाची उपमा देत भाजपवर जोरदार निशाणा साधला.
उद्धव ठाकरेंनी म्हटलं,हवेसारखंच राजकारणातही प्रदूषण वाढलं आहे. सत्तेसाठी जी लाचारी सुरू आहे ती पाहून वेदना होतात. दगाबाज भाजपला धडा शिकवण्यासाठीच महाविकास आघाडी उभी राहिली.
तसेच त्यांनी टीका करत म्हटलं की, काही जण पूर्वी शिव्या देत होते, आज त्यांचेच फोटो काँग्रेसच्या नेत्यांसोबत झळकताना दिसत आहेत.
भगवा पवित्र आहे; कोणतंही चित्र छापू नका-
ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचं सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना संदेश दिला.भगव्यावर कोणतंही चित्र छापू नका. तो शिवरायांचा आहे, पवित्र आहे. मशाल घेऊन पुढे चला; मशालीच्या तेजात सर्व जळमट नष्ट होतील.










