
मुंबई – राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मोठ्या बदलाला सुरुवात झाली असून 2 डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदानासाठी काही ठिकाणी दिलेली सार्वजनिक सुट्टी मागे घेण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या आदेशावर दाखल झालेल्या अपीलांचा निकाल 23 नोव्हेंबरनंतर लागल्यामुळे या मतदारसंघांमध्ये निवडणूक कार्यक्रम पुन्हा आखण्यात आला आहे.
सामान्य प्रशासन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अहिल्यानगरपासून ठाणे, पुणे, सोलापूर, सातारा, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, लातूर, हिंगोली, अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण 24 नगरपरिषद व नगरपंचायतींमध्ये 2 डिसेंबरला असलेली सार्वजनिक सुट्टी रद्द करण्यात आली आहे. या ठिकाणांवरील निवडणूक टप्पा आता सुधारित वेळापत्रकानुसार राबवला जाणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने 4 नोव्हेंबर रोजी राज्यातील 246 नगरपरिषद आणि 42 नगरपंचायतींसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. मात्र काही ठिकाणी अध्यक्षपद व सदस्यपदांच्या अपीलांवर उशिरा निर्णय लागल्याने निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया पुन्हा आखावी लागली. कायद्यानुसार अध्यक्षपद आणि सदस्यपदाची निवडणूक एकत्र घेणे आवश्यक असल्याने संबंधित नगरपरिषदांच्या सर्व वॉर्डांमध्ये सुधारित कार्यक्रम लागू करण्यात आला आहे.
नवीन वेळापत्रकानुसार उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत 10 डिसेंबरपर्यंत ठेवण्यात आली आहे. त्यानंतर 11 डिसेंबर रोजी निवडणुकीसाठी अंतिम उमेदवार यादी जाहीर होईल. त्या पुढे 20 डिसेंबर रोजी सकाळी मतदान घेण्यात येईल आणि 21 डिसेंबरला मतमोजणीची प्रक्रिया सुरू होणार आहे.
उर्वरित सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायतींमध्ये 2 डिसेंबर रोजीचा मतदानाचा कार्यक्रम अपरिवर्तित राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.









