
महाराष्ट्रातील नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकांसंदर्भात मोठा बदल समोर आला आहे. नागपूर खंडपीठाने दिलेल्या महत्वाच्या आदेशानुसार उद्या होणारी मतमोजणी स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे उद्या निकाल जाहीर होणार नसून आता निकाल 21 डिसेंबर रोजी घोषित केले जातील.
निवडणुकांशी संबंधित दाखल झालेल्या याचिकांवर सुनावणी करताना हायकोर्टाने प्रशासनाला मतमोजणी पुढे ढकलण्याचे निर्देश दिले. या आदेशामुळे राज्यातील शेकडो नगरपरिषद व नगरपालिका निवडणुकांच्या प्रक्रियेवर थेट परिणाम झाला आहे.
निवडणूक आयोगाने आता नव्या तारखेनुसार मतमोजणीची सर्व तयारी करण्याचे आदेश संबंधित जिल्हा प्रशासनांना दिल्याची माहिती समोर येते आहे. मतमोजणी पुढे ढकलल्यामुळे उमेदवार व समर्थकांमध्ये विविध प्रतिक्रिया उमटल्या असून, राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज्यातील मतदारांचे लक्ष आता 21 डिसेंबरकडे लागले आहे, कारण याच दिवशी कोणत्या पक्षाच्या हातात सत्ता जाणार याचा निर्णय लागणार आहे.









