
नागपूर — खापरखेडा परिसरातील पिकनिकला गेलेल्या तीन मित्रांवर झालेल्या रक्तरंजित हल्ल्याचा गुन्हा अखेर उघड झाला आहे. क्राईम ब्रांच युनिट-४ने फरार आरोपींना अटक करून तपासात मोठी प्रगती केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २३ नोव्हेंबरच्या संध्याकाळी सुशीलकुमार गेडाम, आशिष गोंडाणे आणि सचिन मिश्रा हे तिघेही ‘बिना संगम’ परिसरात पिकनिकसाठी गेले होते. याच दरम्यान ४ ते ५ अज्ञात युवक त्या ठिकाणी पोहोचले. किरकोळ वाद झाल्यानंतर त्यांनी सुशीलकुमार आणि आशिषवर दगड व चाकूने तुफान हल्ला चढवला.
या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या आशिष गोंडाणे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर सुशील गेडाम यांची प्रकृती अद्याप चिंताजनकस्थितीत आहे. घटना घडताच आरोपी पळून गेले होते.
घटनेनंतर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि तांत्रिक तपासाच्या आधारे क्राईम ब्रांचने सर्व आरोपींचा शोध लावला आणि त्यांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास खापरखेडा पोलिसांकडून वेगाने सुरू आहे.









